आगामी दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आणि शिवसेनेकडून मुंबई महापालिकेकडे परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत यावर कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवाजी पार्कवर नेमका एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे मेळावा घेणार याचा पेच कायम आहे. या सर्वामध्ये शिवसेनेकडून मेळाव्यासाठी प्लॅन ‘बी’ वर काम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

जर, मुंबई महापालिकेने दसरा मेळाव्याला शिवसेनेला परवानगी दिली नाही. तर, प्लॅन बी तयार असावा यासाठी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी MMRDA ला पत्र लिहित बीकेसीतील मैदानाची मागणी केल्याचं समजत आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगारसेनेतर्फे दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी पत्र लिहिण्यात आले असून, बीकेसीमध्ये दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्याची मागणी यात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अधिक वाचा  भाजपचे टेन्शन वाढलं! एकीकडे अबकी बार 400 पारचा खल अन् भाजपाच्या पारंपारिक मतदारांचा ‘नोटा’कडे कल

एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवरील मेळाव्यावर ठाम

दुसरीकडे, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम असून, काल पार पडलेल्या बैठकीतही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जे काही होईल ते नियमानुसार होईल म्हणत शिवाजी पार्कवरच दसरा मेळाव्याचा निर्धार शिंदेंनी व्यक्त केला आहे. त्यात आता शिवसेनेने बीकेसी मौदानावर मेळाव्याच्या परवानगी मिळावी यासाठी पत्र पाठवल्यामुळे शिवसेकडून मेळाव्याच्या नियोजनासाठी प्लॅन बी वर काम सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

दोन्ही गटांकडून पाठवण्यात आलेल्या अर्जांची छाननी करून त्या संदर्भातील अहवाल मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवला जाणार आहे. त्यानंतरच नेमकी शिंदे गटाला की ठाकरे गटाला शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठी परवानगी देण्यावर निर्णय घेतला जाणार आहे.