पूणे : नवारात्राच्या तोंडावर विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात नवा वाद निर्माण झाला आहे. सेक्स तंत्राच्या जाहिरातीमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे, त्यामुळे पुण्यात चाललंय काय? असा प्रश्न पुणेकरही विचारत आहेत. नवरात्र स्पेशल कॅम्प कोर्सची जाहिरात व्हायरल झाली आहे. हा कोर्स सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशनचा असल्याचंही जाहिरातीमध्ये सांगण्यात आलं आहे.

सेक्स तंत्र कोर्ससाठी ऑनलाईन बुकिंगची ही जाहिरात असल्याचं समोर आलं आहे. सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशनचा सेक्स तंत्राचा हा तीन दिवसांचा कोर्स आहे. हा कोर्स नेमका काय आहे, तिकडे काय केलं जाणार आहे? याबाबत जाहिरातीमध्ये कोणतीही सुस्पष्टता देण्यात आलेली नाही. 15 हजार रुपये देऊन तीन दिवसांचा हा कोर्स असल्याची जाहिरात करण्यात आली आहे. तरुण-तरुणींना हे 1 ते 3 ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव स्पेशल पॅकेज असल्याचं सांगितलं गेलं आहे.

अधिक वाचा  सगळ्यात मोठे धर्मसंकट एकीकडे फडणवीस अन् दुसरीकडे शेतकरी… नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्गामुळे महायुती आमदार धर्मसंकटात

या कोर्समध्ये वैदिक सेक्स तंत्र, स्नायूंना ताकदवान बनवणं, मेडिटेशन अशा वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं सांगण्यात आलं आहे. सत्यम शिवम सुंदरम हे फाऊंडेशन नेमकं कुणाचं आहे? हा कोर्स कुठे घेण्यात येणार आहे, याबाबत या जाहिरातीमध्ये कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

दरम्यान हिंदू महासंघाने या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. सेक्स तंत्र या नावाने पुण्यात गलिच्छ आणि विकृत व्यवसाय करण्याचा घाट घालत आहे. नवरात्री स्पेशल असं नाव याला दिलं गेलं आहे. हा हिंदूचा आणि त्यांच्या देवतांचा अपमान आहे, हे हिंदू महासंघ सहन करणार नाही, असं हिंदू महासंघाचे आनंद दवे म्हणाले आहेत. या जाहिरातीमध्ये आयोजकांचा पत्ता आणि इतर कोणतीही माहिती नाही. यावरून हे सगळं फसवं, घाणेरडं आणि एका नवीन विकृत संस्कृतीला जन्म देणारं ठरणार आहे. हिंदू महासंघ हे होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया दवे यांनी दिली आहे.

अधिक वाचा  “आरएसएस हे विष आहे”, तुषार गांधींच्या विधानावरून वाद; माफीच्या मागणीस स्पष्ट नकार! गांधींच्या मारेकऱ्याचे वंशज आता…. भिती व्यक्त 

शुक्रवारी दुपारी 12 वाजता आम्ही सीपी ऑफिसवर याबाबतचे निवेदन द्याययला जाणार आहोत, या विकृतीला रोखण्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करू, असं दवे यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही या जाहिरातीवर टीका केली आहे. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले पुणे पोलीस काय करत आहेत? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तर पुण्यात हे काय सुरू आहे? अशी फेसबूक पोस्ट सामाजिक कार्यकर्ते आणि वकिल असीम सरोदे यांनी टाकली आहे.