मुंबई: शशांक मनोहर यांनी काल (बुधवार) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गेल्या दोन वर्षापासून ते या पदावर होते. मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर एक नको असलेल्या गोष्टीपासून सुटका झाली, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी दिली.
मनोहर यांनी नोव्हेंबर २०१५ साली आयसीसीचे अध्यक्षपद स्विकारले होते. त्यांनी प्रत्येकी दोन वर्षांचे दोन कालावधी पूर्ण केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची जबाबदारी घेण्याआधी मनोहर २००८ ते २०११ आणि नोव्हेंबर २०१५ ते मे २०१६ काळात बीसीसीआयचे अध्यक्ष होते. आयसीसीच्या नियमानुसार एका व्यक्तीला सलग सहा वर्ष अध्यक्षपदावर राहता येत. त्यानुसार मनोहर यांना आणखी दोन वर्षाचा कालावधी मिळू शकत होता. पण त्यांना स्वत:हून तिसरी टर्म नाकारली.
आता नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत इम्रान ख्वाजा हे हंगामी अध्यक्ष असतील. नव्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष कोलिन ग्रावेस हे मुख्य दावेदार मानले जात आहेत. इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज बोर्डाने ग्रावेस यांना पाठिंबा दिला आहे. पण बीसीसीआयने अद्याप त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला नाही. मनोहर यांच्या तुलनेत ग्रावेस आणि बीसीसीआयचे संबंध चांगले राहिले आहेत.
बीसीसीआय मनोहर यांच्या निर्णयावर नाराज होती. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी भारतीय क्रिकेटच्या हिताविरोधातील अनेक निर्णय घेतले होते. मनोहर यांच्या राजीनाम्यावर श्रीनिवासन म्हणाले, बीसीसीआयची सूत्रे नव्या नेतृत्वाकडे आल्यापासून मनोहर यांना याची कल्पना आली होती की आपण फार काळ भारताचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. त्याच बरोबर स्वत:च्या मर्जी प्रमाणे गोष्टी करता येणार नाहीत. पुढे जाण्याची संधी नसल्यामुळे त्यांनी पळ (राजीनामा) काढला.
अनेक आघाडीवर मनोहर यांनी भारतीय क्रिकेटचे जितके नुकसान केले आहे तितके नुकसान अन्य कोणत्याही प्रशासकाने केले नाही, अशा शब्दात श्रीनिवासन यांनी मनोहर यांच्यावर तोफ डागली.
मनोहर यांनी भारतीय क्रिकेटचे इतके नुकसान केले आहे की, आता त्यांच्या राजीनाम्यामुळे भारतीय क्रिकेटमधील प्रत्येक व्यक्ती आनंदी होईल. त्यांनी भारतीय क्रिकेटचे अर्थकारण बिघडवले, आयसीसीमधील भारताच्या संधी कमी केल्या. ते एक भारत विरोधी असून त्यांनी जागतिक क्रिकेटमधील भारताचे महत्त्व कमी केले. आता त्यांनी पळ काढला आहे कारण त्यांना माहित आहे की भारतीय नेतृत्वाकडून (बीसीसीआय) पाठिंबा मिळणार नाही. त्यांनी भारतीय क्रिकेटचे आतोनात नुकसान केल्याचे श्रीनिवासन म्हणाले.

अधिक वाचा  भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या प्रभागातूनच बंडखोरी; ब्राह्मण समुदायाची ‘ही’ सल या तरुणाने पुकारला ‘एल्गार’