पुणे : शनिवारी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगराला जोडणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीने नागरिकांना हैराण केले. १०-१५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांवर तासभर वाहतूक कोंडीत काढण्याची वेळ आली. एरवी चांदणी चौक किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा त्रास सगळ्यांना होतो. मात्र व्हीआयपी दौरे, बंद पडलेल्या बस, मेट्रोचे काम, पाऊस, वाहतूक पोलिसांचा अभाव, शनिवारच्या सुटीची गर्दी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतूक कोंडीत जसजशी भर पडत गेली, तसतसा वाहनचालकांचा संताप वाढत गेल्याची सद्यःस्थिती होती. शहरात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने अगोदरच वाहतूक संथगतीने सुरू आहे. मात्र शनिवारी सुटीचा दिवस असतानाही सकाळपासूनच प्रमुख रस्ते, चौकांत मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याचे चित्र होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही पुण्यात विविध ठिकाणी कार्यक्रम होते. त्यामुळे रात्री स्वारगेट ते कृषी महाविद्यालय व कोथरूड ते विमानतळ या मार्गावरून ‘व्हीआयपी’ जाणार असल्याने ठिकठिकाणी काही वेळ वाहतूक थांबविण्यात आली. त्यामुळे जंगली महाराज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या. महापालिका, काँग्रेस भवन ते बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणीही वाहतूक कोंडी झाली. जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाल्याने बहुतांश नागरिकांनी पेठांमधील अंतर्गत रस्ते, डेक्कन, आपटे रस्ता, घोले रस्ता, प्रभात रस्ता, डेक्कन नदीपात्र, विधी महाविद्यालय रस्ता या मार्गाने इच्छितस्थळी जाण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा  TMKOC मधील ‘सोढी’ बेपत्ता प्रकरणी मोठी अपडेट, स्वत: तयार केला प्लान? पोलिसांचे पथक मुंबईत दाखल

दरम्यान, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, कात्रज, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, दांडेकर पूल, सिंहगड रस्ता या ठिकाणीही कोंडी झाली. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोपोडी ते अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याच पद्धतीने येरवड्यापासून, विमानतळ परिसर, रामवाडी, वडगाव शेरी, वाघोलीपर्यंत वाहतूकीची कोंडी झाली होती.

फडणवीसांनाही कोंडीचा फटका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला. ‘एमआयटी’तील कार्यक्रम झाल्यानंतर फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरून विमानतळाकडे जात होता. त्या वेळी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने फडणवीस यांच्या वाहनांचा ताफादेखील कोंडीपासून सुटू शकला नाही. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करून मार्ग मोकळा केला.

अधिक वाचा  फिटनेसप्रेमी पुणेकरांतर्फे ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’ आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास प्राधान्य: मुरलीधर मोहोळ

शनिवारी व्हिआयपी दौरे होते. तसेच बस बंद पडणे, शनिवारची पादचाऱ्यांची गर्दी, दुहेरी पार्कींग, पाऊस, खड्डे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतुक कोंडी झाली होती. वाहतुक पोलिस ठिकठिकाणी नियुक्त केले होते. वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु होते.

– चंद्रकांत सांगळे, सहाय्यक पोलिस आयुक्त

मी जंगली महाराज रस्त्यावरुन डेक्कन मार्गे कोथरुडला जात होतो. सायंकाळी सात वाजता बालगंधर्व रंगमंदिर परिसरात आलो. तेव्हा, तेथून पुढे जाण्यासाठी माझा पाऊणतास वेळ वाया गेला.

– विजय कांबळे, नोकरदार

सोशल मीडियावर पडसाद

शहराच्या मध्यवर्ती भागासह विमानतळ परिसरातही शनिवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांनी फेसबुक, ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त केला. एका नागरिकाने ‘पुणे दिल्ली प्रवासासाठी जितका वेळ लागत नाही, तितका वेळ विमानतळ ते विधी महाविद्यालय रस्त्यावर जाण्यासाठी वेळ लागतो. फारच वाईट ट्राफिक’ अशा शब्दांत नागरिकांनी आपला राग व्यक्त केला.

अधिक वाचा  सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

असा लागला वेळ

– स्वारगेट ते धायरी अंतर ११ किमी- वेळ दीड तास

– डेक्कन ते कोथरूड – ४.५ किमी- ४५ मिनिटे

– शनिवारवाडा ते बाणेर- ९.५किमी -२ तास

– स्वारगेट ते शनिवारवाडा – ३.५किमी – ४० मिनिटे

– संगमवाडी ते विमानतळ ८ किमी – दीड तास