नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे देशातील मृतांची एकूण संख्या ७९ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाचे ४७२ रुग्ण वाढले आहेत आणि रुग्णांची देशातील एकूण संख्या ही ३३७४ पर्यंत गेली आहे. तर २६७ जणांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशातील २७४ जिल्ह्यांमध्ये झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
करोनाचा संसर्ग झाल्यावर ४ ते ५ दिवसांत रुग्ण समोर येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. करोनाच्या संसर्गाने रुग्ण दुप्पट होण्यास किती दिवस लागत आहेत? प्रश्न आरोग्य मंत्रालयाला करण्यात आला होता. त्यावर आरोग्य मंत्रालयाने हे उत्तर दिलं. पण तबलीघी जमातच्या मकरझमधील धार्मिक कार्यक्रमामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. तबलीघी जमातचा हा कार्यक्रम झाला नसता तर करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आणखी कमी झाला असता. ७ ते ८ दिवसांत करोनाच एक रुग्ण समोर आला असता, असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं.
देशात सध्या पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट (PPE) किटचा तुटवडा आहे. आपण हे आयात करत आहोत. जानेवारीपासूनच सरकारने यावर उपयायोजना सुरू केल्या आहेत. देशातील उत्पादकांनी या PPE किटचे उत्पादन सुरू केले आहे. तसंच ज्या कुठल्या देशांमध्ये PPE किट उपलब्ध आहेत तिथून ते मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. PPE किटचा पुरवठा आहे संबंधित राज्यांमध्ये आढळून आलेल्या रुग्ण संख्येच्या आधारावर करण्यात येत आहे. एकूण परिस्थिती लक्षात घेता आम्ही PPE किट खरेदीवर अधिक भर दिला आहे, असं अग्रवाल यांनी PPE किटच्या अपुऱ्या पुरवठ्यावर स्पष्ट केलं.
१३.६ लाख कामगारांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था त्यांच्या कंपन्यांनी आणि उद्योगांनी केली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये २७, ६६१ शिबिरं आणि छावण्या उभारण्यात आल्या आहेत. यापैकी २३, ९२४ छावण्या सरकारच्या आहेत. तर ३, ७३७ शिबिरं ही स्वयंसेवी संस्थांची आहेत. यात १२.५ लाख नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. तसंच सरकार आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आणखी १९, ४६० छावण्या उभारल्या गेल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्व यांनी दिली.