मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आता दिग्दर्शन क्षेत्रातही उतरत आहे. नुकतंच तिने तिचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट ‘अपराजिता अयोध्या’ बद्दल चर्चा केली. ‘बाहुबली’ सिनेमाचे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी ‘अपराजिता अयोध्या’ सिनेमाचं लेखन केलं आहे. या सिनेमाची कथा राम मंदिर घटनेशी संबंधीत असेल. स्वतः कंगना या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.
यावर कंगना म्हणाली की, ‘सुरुवातीला या सिनेमाचं दिग्दर्शन करावं हे काही माझ्या डोक्यात नव्हतं. मला या सिनेमाची फक्त निर्मिती करायची होती. कारण तेव्हा मी इतर कामात फार व्यग्र होते. पण केवी विजयेंद्र प्रसाद यांनी जी स्क्रिप्ट लिहिली त्यावर फार भव्य सिनेमा तयार होऊ शकतो. यात अनेक ऐतिहासिक गोष्टींचाही सहभाग असणार आहे. मला अशा सिनेमाच्या चित्रीकरणाचा पहिला अनुभव आहे. माझ्या सहकार्यांनाही हा सिनेमा मी दिग्दर्शित करावा असं वाटत होतं.’
असं म्हटलं जातं की, कंगना या सिनेमाचं फक्त दिग्दर्शन करणार आहे. अभिनेत्री म्हणून वेगळ्या कलाकाराचा विचार करण्यात येईल. याआधी तिने ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमाचंही दिग्दर्शन केलं होतं. अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर पंगा सिनेमात ती शेवटची दिसली होती. लवकरच ती तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारीत ‘थलायवी’ सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

अधिक वाचा  लोकसभा दुसरा टप्पा निवडणुक अधिसूचनाही निघाली तरी महायुतीत जागावाटपाचा येथे तिढा? अजुनही बैठका