इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूर येथे ज्या टाटपट्टी बाखल भागात संशयितांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली, त्या भागात एकूण १० जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात डॉक्टरांच्या पथकावर १ एप्रिल या दिवशी दगडफेक करण्यात आली होती.
आरोग्य विभागाने रात्री उशिरा जारी केलेल्या मेडिकल बुलेटीननुसार ३ आणि ४ एप्रिल रोजी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एकूण १६ जणांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या १६ जणांपैकी १० जण हे टाटपट्टी भागातील आहेत. या रुग्णांमध्ये ५ पुरुष आणि ५ महिला आहेत. हे १० जण २९ वर्षे ते ६० वर्षे वयोगटातील आहेत.
डॉक्टरांच्या पथकावर केला होता हल्ला
इंदूरमधील टाटपट्टी बाखल भागात डॉक्टरांचे एक पथक १ एप्रिलला स्क्रीनिंग करण्यासाठी गेले असता तेथील रहिवाशांनी डॉक्टरांच्या पथकावर दगडफेक केली. या घटनेवर संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दगडफेक करणाऱ्या या लोकांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करत त्यांची रवानगी तुरुंगात केली.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने डॉक्टर आणि त्यांच्या पथकाला सुरक्षा पुरवण्याबाबत राज्यांमधील सरकारांना पत्र लिहिले आहे. जे कर्मचारी आणि अधिकारी आरोग्यसेवेत काम करत आहेत, अशांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्यात यावी, अशा सूचना पत्राद्वारे देण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी दिली. या बरोबरच वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचेही निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.
केवळ इंदूरच नव्हे, तर गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याचे उघड झाले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली होती. वैद्यकीय कर्मचारी हे देवाच्या रुपात आमच्यासाठी काम करत असून त्यांच्याशी अशा प्रकारचा व्यवहार करणे गैर असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. यूपीपासून ते बिहारपर्यंत तसेच इतर राज्यांमध्येही डॉक्टरांवर हल्ले झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. तेलंगणमध्ये देखील एका रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर तेलंगण सरकारने हल्लेखारांवर कारवाई केली.