प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मंगळवारी एक विचित्र घटना घडली आहे. स्पेशल टास्क फोर्समध्ये (STF) तैनात असलेल्या एका जवानाचे लग्न थेट किन्नरसोबत लावून देण्यात आलं आहे. लग्न झाल्यानंतर जेव्हा हे सत्य समोर आलं तेव्हा तो जवान सुन्न झाला. लग्नानंतर जवानाने केंट ठाण्यात किन्नर पत्नी आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात फसवणुकीचा आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे.
बेली रुग्णालयाजवळ राहणाऱ्या स्पेशल टास्क फोर्समधील (STF) जवान यांच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. पत्नीनंतर एकट्याने दोन्ही लहान मुलांचा सांभाळ कसा करायचा, या चिंतेतून त्याने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. आई ही मुलांचे संगोपन अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते म्हणून तो लग्नासाठी मुलींबाबत विचारणा करीत होता. यादरम्यान राजीगंज नावाच्या एका व्यक्तीकडून त्याला लग्न करण्यासाठी तयार असणाऱ्या एका मुलीबद्दल माहिती मिळाली. ही मुलगी करनपुर येथे राहत असल्याचे रानीगंज यांनी सांगितले. यानंतर भेटी-गाठी झाल्यावर तातडीने साखरपुडाही केला. जवानाने यामागे रानीगंज या व्यक्तीचा हात असल्याचा आरोप केला आहे.
साखरपुड्यानंतर लग्नही झालं. जेव्हा मुलगी लग्न करुन आपल्या सासरी आली तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली. जवानाने विरोध केल्यानंतर किन्नरच्या आई-वडिलांनी जवानाला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे जवान पूरता हादरला. मानसिकदृष्ट्या खचलेल्या जवानाने याची तक्रार एसएसपीकडे केली आणि या प्रकरणात केंट ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.