कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाविरोधात बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बाजीराव खाडे यांची काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली. पण, अशीच भूमिका घेतलेल्या विशाल पाटील यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाहीये. त्यामुळेच वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत असून, याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी काँग्रेस विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेस नेत्यांनी माघार घेण्याची विनंती करूनही विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. पण, अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.

अधिक वाचा  शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ; केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली

दुसरीकडे काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधातच अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या बाजीराव खाडे यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. त्यामुळे एका नेत्यावर महाराष्ट्र काँग्रेसने कारवाई केली, मग दुसऱ्या नेत्यावर का नाही?

विशाल पाटलांवर कारवाई का केली नाही?

याबद्दल ‘लोकमत’ने काँग्रेस नेत्यांच्या हवाल्याने एक वृत्त दिले आहे. त्यात काँग्रेस नेत्याने म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या उमेदवारांवर कारवाई करण्याचे अधिकार पक्षाचे अध्यक्ष किंवा राज्य प्रभारींना असतात.

दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रदेश काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे प्रतिनिधी नियुक्त केले जातात. यात काही प्रतिनिधी हे प्रदेश काँग्रेसच्या वतीने नियुक्त केले जातात, तर काही प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने नियुक्त केले जातात. विशाल पाटील हे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे लवकरच निवृत्त होतील, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खोचक निशाणा

त्यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा अखिल भारतीय काँग्रेसलाआहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने विशाल पाटील यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे प्रदेश काँग्रेसमधील एका नेत्याने सांगितले आहे.