कोल्हापूर : महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. शनिवारी (ता. २७) सायंकाळी चार वाजता तपोवन मैदानावर होणारी ही सभा अतिविराट होईल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या सभेला दोन लाखावर गर्दी होईल, असेही ते म्हणाले.

या सभेच्या नियोजनासाठी कोल्हापुरात हॉटेल पॅव्हेलियनमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट, शिवसेना- एकनाथ शिंदे गट आणि मित्र पक्षांच्या प्रमुख नेतेमंडळींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

अधिक वाचा  भोसरीमधील नागरिकांकडून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांचे उत्साहात स्वागत

यावेळी मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसनशील भारत ही ओळख पुसून विकसित भारत हा नवा लौकिक निर्माण केला आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचे आणि भारतवासीयांना कल्याणकारी योजना देण्याचे मोठे कार्य केले आहे. जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने या दोन्हीही जागा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. असेही ते म्हणाले.

स्वागत व प्रास्ताविकात खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापुरात होत असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ऐतिहासिक होईल. महायुतीतील सर्वच नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी ही अतिविराट सभा यशस्वी करायचा निर्धार केला आहे. त्यासाठी महायुतीमधील सर्वच घटकांनी समन्वयाने नियोजन करून प्रत्येक तालुकानिहाय या सभेचे नियोजन करावे.

अधिक वाचा  विकसीत, सुरक्षित आणि पर्यावरणपुरक पुण्याचे संकल्पपत्र

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आंबिटकर यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, वैयक्तिक बदनामी, वादग्रस्त वक्तव्ये आणि चुकीचे आरोप यासारखे मुद्दे टाळले पाहिजेत. आरोप- प्रत्यारोपामुळे या बाजूकडून शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका होईल, असेच हे षडयंत्र दिसते. कोणाशी काही जर धमकीसारखा चुकीचा प्रकार असेल तर संबंधितांनी पोलिसात जाऊन तक्रार द्यावी. त्यासाठी हातात काठी घेऊन बसण्याची काय गरज आहे?

अधिक वाचा  भाजपचे टेन्शन वाढलं! एकीकडे अबकी बार 400 पारचा खल अन् भाजपाच्या पारंपारिक मतदारांचा ‘नोटा’कडे कल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, समरजित घाटगे आदी प्रमुख उपस्थित होते.