महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे मोदी-शहांचे टार्गेट असतानाच, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी मात्र, नवेच गणित मांडले आणि महाविकास आघाडी 18 जागा जिंकू शकते, अशी शक्यता बोलून दाखवली. म्हणजे, सरळ-सरळ भाजप आणि मित्रपक्षांचे 30 खासदार निवडून येतील, असेच शेलार खात्रीने सांगत आहेत.
दुसरीकडे, ठाकरे, पवार आणि काँग्रेसची पडझड होऊनही आघाडीचे 18 मतदारसंघात वर्चस्व असेल, असेही शेलार यांनी केलेल्या बेरीज-वजाबाकीतून दिसत आहे. आकडेमोड करताना शेलारांनी चॅलेंज केले आणि मविआ 18 जागांच्या पुढे गेल्यास राजकीय संन्यास घेईन, असे ही सांगून मोकळे झाले. थोडक्यात काय तर मविआ मागे राहणार नाही आणि भाजपला 45 जागा मिळणार नाहीत, हेही शेलारांनी आता जाहीर करून टाकल्याचे दिसत आहे.
आशिष शेलार यांनी एका मराठी दैनिकाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लोकसभेच्या या जागांबाबत गणित मांडले आहे. यावेळी शेलार यांना एक प्रश्न विचारण्यात आला. “तुमच्या मते या निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्या पक्षांची स्थिती काय होईल? या प्रश्नाला शेलारांनी थेट उत्तर दिले.
आशिष शेलार म्हणाले, ” भाजपने 45 जागांचा आकडा दिला असा उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांना मी नम्रपणे आव्हान दिलं आहे. भाजपने राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर तुम्ही राजकीय निवृत्ती घेणार का? आणि हे आव्हान एका बाजून असू शकत नाही. म्हणून मी प्रतिआव्हानही दिलं. तुम्ही (ठाकरे) आमच्या बरोबर होतात तेव्हा तुमचे 18 खासदार होते. पण आता तुम्ही महाविकास आघाडीत असताना जर तिन्ही पक्षांचे मिळून 18 खासदार आले किंवा 18 च्या वर गेले तर मी राजकीय निवृत्ती घेईन. त्यामुळे निवृत्तीचा खेळ आपण निवडणुकांच्या निकालानंतर खेळू, असे शेलार यांनी आव्हान दिलं आहे.
देवेंद्र फडणवीसांचा आकडा किती?
राज्यातील लोकसभा जागांबाबतही काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही दावा केला होता. माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “महाराष्ट्रात महायुती किमान 41 जागांवर निश्चितपणे विजय मिळवणार आहे. तर दुसरीकडे भाजपकडून देशभरात एनडीए 400 पारचा नारा दिला जात आहे. भाजपच फक्त 370 जागांवर विजय मिळवेल, असा भाजपचा विश्वास आहे. तर महाराष्ट्रात भाजप 45+ जाईल असे भाजपकडून लक्ष्य ठेवले आहे.