कलाविश्वामध्ये क्षणात नाती बनतात आणि कोणतीही कल्पना नसताना याच नात्यात दुरावाही येतो. दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार नागार्जुनचा छोटा मुलगा अखिल अक्कीनेनीच्या बाबतीतही हेच घडलं होतं. प्रसिद्ध व्यावसायिक जीव्हीके रेड्डी यांची नात श्रिया भूपल हिच्याशी तो डेट करत होता. हैदराबादमध्ये एका दिमाखदार सोहळ्यात या दोघांचा साखरपुडाही पार पडला होता. मात्र त्या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. लग्नापूर्वीच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
लग्न ठरण्याआधी जवळपास दोन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. साखपुड्यानंतर हे प्रेमीयुगुल इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार होते. या दोघांच्या लग्नसोहळ्यासाठी जवळपास सहाशे मंडळी भारतातून इटलीला जाणार असल्याचेही म्हटले जात होते. पण, अखिल आणि श्रिया यांच्या काही कारणावरून बिनसले आणि दोघांनीही हे नाते इथेच थांबविण्याचा निर्णय घेतला. अभिनेता नागार्जुन आणि जीव्हीके रेड्डी यांनी या दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्याचा फारसा काही परिणाम या दोघांवर झाला नाही. अखेर त्यांनी हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
अखिल आणि श्रियाच्या लग्नाची तारीख जवळ आल्यामुळे पाहुण्यांनी त्यांच्या लग्नाला जाण्यासाठीची तयारी आणि आरक्षण वगैरे करण्यास सुरुवात केली होती. पण, त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे सर्व पाहुण्यांना त्यांची विमानाची बुकिंग रद्द करण्यास सांगण्यात आले.
श्रिया दाक्षिणात्य फिल्मफेअरसाठी अधिकृतरित्या कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम पाहते. तिने टॉलिवूडमध्ये श्रिया सरन, काजल अग्रवाल, रकुल प्रित यांच्यासाठी काम केले आहे. तर बॉलिवूडमध्ये तिने श्रद्धा कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबत काम केले आहे.

अधिक वाचा  धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक; अदानींना झेपत नसेल तर…