मागील वर्षी राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत एनडीए उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही गेले होते. तिथे भाजपची सत्ता आली अन् साडेचार महिन्यांत शिंदेंना थेट राजस्थानात शिवसेनेची पाळेमुळे रुजवण्याची संधी मिळाली आहे. बहुजन समाज पक्षातील दोन्ही आमदारांना शिवसेनेत आणत त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत.

राजस्थान राज्यातील बसपचे आमदार जसवंत सिंह आणि मनोज कुमार राठोड यांनी काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना सचिव अभिजित अडसूळ, शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी, प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेनेचे राजस्थान राज्य प्रमुख लाखनसिंह पंवार उपस्थित होते.

अधिक वाचा  शिंदे सेनेला शरद पवारांचा धक्का, करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार हाती घेणार तुतारी

जसवंत सिंह गुर्जर हे निवडणुकीआधी भाजपमधून बसपमध्ये आले होते. त्यांनी बरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला आहे, तर मनोज कुमार यांनी सादुलपूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार कृष्णा पुनिया यांचा पराभव केला. राजस्थानमधील बसपचे दोन्ही आमदार सेनेत आल्याने मायावतींना मोठा धक्का बसला आहे.

प्रवेशावेळी बोलताना शिंदे, म्हणाले राजस्थान आणि महाराष्ट्र यांचे एकमेकांशी शौर्याचे एक नाते आहे. राजस्थान ही शूरवीर महाराणा प्रताप यांची भूमी आहे, तर महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यांचेच विचार अंगीकारून आमच्या सरकारची वाटचाल सुरू असून, या भूमीतून शिवसेनेमध्ये दोन नवे शिलेदार सामील झाल्यामुळे राजस्थानमधील शिवसेना अधिक बळकट झाली आहे.

अधिक वाचा  काँग्रेसविरोधात बंडखोरी तरी यामुळे विशाल पाटलांवरची कारवाई लांबली; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही मर्यादा

विधानसभा निवडणुकीवेळी मी स्वतः राजस्थानात एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलो होतो. तेथील लोकांमध्ये चांगले काम करायला मोठी संधी आहे, वैद्यकीय क्षेत्रात काम केल्यास त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. तसेच शिवसेनेच्या ध्येयधोरणानुसार सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी काम करावे, असेही यासमयी सुचवले, असे मुख्यमंत्री म्हणाले.