मुंबई: राजेशाही थाटाच्या मोटारी बनवणाऱ्या मर्सिडीज बेन्झने आज भारताल आपली पहिली इलेक्ट्रिक मोटार बाजारात आणली आहे. तिची किंमत तब्बल दोन कोटी 45 लाख रुपये आहे. मर्सिडीजतर्फे 2025 पर्यंत विकल्या जाणाऱ्या निम्या मोटारी विजेवर चालणाऱ्या असतील. तर 2030 पर्यंत जिथे बाजारपेठ असेल तेथे फक्त इलेक्ट्रिक मोटारीच विकल्या जातील. यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात मर्सिडीज ने जगात पंचेचाळीस हजार इलेक्ट्रिक मोटारी विकल्या.

तर भारतात येत्या पाच वर्षात मर्सिडीजतर्फे विकल्या जाणाऱ्या मोटारींपैकी एक चतुर्थांश मोटारी विजेवर चालणाऱ्या असतील, असेही मर्सिडीज बेन्झ इंडियाचे एमडी व सीईओ मार्टिन श्वेंक यांनी सांगितले. आज रस्त्यावर आणलेल्या इ क्यू एस या मोटारीसाठी वापरलेल्या लोखंडापैकी 80 टक्के लोखंड हे पुनर्वापर प्रक्रियेतून निर्माण केले आहे. तर मोटारीतील 80 किलोंचे वेगवेगळे भाग हे देखील पुनर्वापर करून तयार केले आहे. वाया गेलेल्या प्लास्टिक बाटल्यांपासून सिटकव्हर तयार करण्यात आले आहे.

अधिक वाचा  वाढवण बंदर खडक रचनेमुळे परिसर मत्स्यबीज उत्पादनास अनुकूल विरोध पेटला, स्थानिक सर्वेक्षण मच्छिमारांनी रोखलं

या मोटारीचा कमाल वेग 250 किलोमीटर असून हिची 80 टक्के चार्जिंग तीस मिनिटातच होते. 610 लिटरची मोठी डिकी, ड्रायव्हर साठी हायपरस्क्रीन, इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेड सीट, सुरक्षेसाठी नऊ एअर बॅग, वेग-तापमान आदिवर लक्ष ठेवणारे साडेतीनशे सेन्सर, ड्रायव्हरसाठी फेस रेकग्निशन कॅमेरे अशी या मोटारीची वैशिष्ट्ये आहेत. तिच्यातील एचईपीए फिल्टरमुळे बाहेरून येणारी हवा 99.65 टक्के शुद्ध होऊनच आत येते. विशेष म्हणजे निघण्यापूर्वी दहा मिनिटे आधी घरातूनच रिमोटने हवा शुद्धीकरण सुरू करता येते. एकदा चार्ज केल्यावर ही मोटार सव्वा पाचशे ते पावणे सहाशे किलोमीटर अंतर धावते.

अधिक वाचा  ४५ हजार ८९१ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प; गतवर्षीपेक्षा महसुली तूट दुपटीहून जास्त वाढली

या वर्षभरात मर्सिडीजतर्फे भारतात तीन इलेक्ट्रिक मोटर आणल्या जातील. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस येणारी ईक्यूबी ही सात आसनी इलेक्ट्रिक मोटर असेल. पर्यावरणाची जपणूक करण्याच्या हेतूने मर्सिडीज आता इलेक्ट्रिक मोटारींच्या निर्मितीवर भर देणार आहे. तसेच मर्सिडीजच्या कारखान्यांमध्येही प्रदूषण कमी करून स्वच्छ ऊर्जा वापरण्यात येत आहे व त्यात वाढ करण्यात येईल. मर्सिडीजच्या सर्व चार्जिंग स्टेशनवर मर्सिडीजच्या सर्व मोटारींना एक वर्ष विनामूल्य चार्जिंग दिले जाईल, असेही मार्टिन यांनी सांगितले.