माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याचा धक्का भाजपला बसला नाही, असे वाटत होते. मात्र, मोहिते पाटील यांचा हा निर्णय भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. शरद पवार यांच्या या खेळीने ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपची दमछाक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्याच्या राजकारणात 2019 नंतर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. असे यापूर्वी कधी घडले नव्हते, असे राजकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात. राज्यातील नागरिक याला साक्षी आहेत. अभेद्य वाटणारी शिवसेना-भाजप ही पारंपरिक युती तुटली. विरुद्ध विचारांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि शिवसेनेतील फुटीमुळे ते अडीच वर्षांनी कोसळले. अख्खे पक्षच्या पक्ष फोडण्यात आले. ज्या पक्षाने दोन वेळेस मुख्यमंत्री केले, अशा नेत्यांनीही पक्ष सोडला आणि भाजपची वाट धरली. हे सर्व एकाच बाजूने सुरू होते. म्हणजे अनेक पक्ष फुटून भाजपकडे जात होते. अन्य पक्षांतून बाहेर पडून नेतेही भाजपमध्ये जात होते. भाजपचे दिग्गज नेते फुटले, असे काही घडले नव्हते.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक पक्षांतर घडले आणि भाजपला धक्का लागला. गेल्या पाच वर्षांत अन्य पक्षांना सातत्याने धक्के देणारा भाजप हे पक्षांतर फार गांभीर्याने घेणार नाही, असे वाटले होते, मात्र तसे घडले नाही. या पक्षांतरामुळे भाजपचा स्वाभिमान दुखावला आहे, अहंकाराला ठेच लागली आहे, असे दिसून येत आहे. राज्यातील भाजपचे सर्वात शक्तिशाली नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 27 एप्रिल रोजी प्रचारासाठी अकलूजला आले होते. त्यावेळी त्यांनी केलेले भाषण, वापरलेले शब्द चर्चेचा विषय ठरले आहेत. या पक्षांतरामुळे फडणवीस यांचा किती त्रागा झाला आहे, हेही या वेळी दिसून आले.
मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलोय, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच केले आहे. याचा अर्थ असा की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस देवेंद्र फडणवीस यांनीच फोडले आहेत. खुद्द फडणवीस यांनीच त्याची कबुली दिली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आम्ही फोडले नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काही दिवसांपूर्वी राज्यातील एका प्रचार सभेत म्हटले होते, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्ष फोडले, त्यामुळे संबंधित पक्षप्रमुखांना किती मनःस्ताप झाला असेल, याची प्रचिती फडणवीस यांनी अकलूज येथे केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील नागरिकांना आली असेल. मी ज्यांना मदत केली, त्यांनी विश्वासघात केला, त्यांचा सत्यानाश होणार…. असे फडणवीस यांनी म्हटले होते.
राज्यातील दिग्गज नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस यांनी हे इशारेवजा वक्तव्य केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपचा एक नेता फोडला, तर फडणवीस इतका त्रागा करून घेत आहेत. फडणवीस यांनी दोन पक्ष फोडले. त्यामुळे संबंधित पक्षप्रमुखांना किती त्रास झाला असेल, राज्यातील नागरिकांमध्ये त्यामुळे काय संदेश गेला असेल, याचा विचार फडणवीस यांनी कधी केला असेल का? पक्षांतरे, फाटाफूट हा राजकारणाचा अनिवार्य भाग समजला जातो. आज हा तर उद्या तो… असे होतच राहणार, असे लोकांनीही गृहीत धरले आहे. मात्र आपल्याही वाट्याला असे काही येऊ शकेल, याचा विचार भाजप नेत्यांनी कधी केला नसेल, असे दिसत आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांचा धक्का भाजपसाठी अनपेक्षित होता. मग, त्यातून सत्यानाश असा शब्दप्रयोग, अद्याप भाजपमध्येच असलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांचे स्वागत न स्वीकारणे वगैरे प्रकार घडले.
देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्ष फोडले, हे सर्वांना माहीत होते, पण स्वतः फडणवीस यांनी त्याची कबुली दिली नव्हती. 2019 ची विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप युती अशी लढवण्यात आली होती. निवडणूक झाल्यानंतर मात्र शिवसेनेचे सूर बदलले. प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद विभागून घ्यायचे आहे, असे ठरल्याचे उद्धव ठाकरे म्हणू लागले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘मातोश्री’वर बंद खोलीत तसा शब्द दिल्याचा दावा उद्धव ठाकरे सातत्याने करू लागले. हा दावा देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनी सातत्याने नाकारला. युती असतानाही त्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे काही उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला, अनेक उमेदवारांसमोर शक्तिशाली अपक्ष नेत्यांना उभे केले, असा समज शिवसेनेचा झाला होता.
अखेर शिवसेना-भाजप युती तुटली आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शरद पवार यांच्यामुळे अस्तित्वात आलेला हा अनोखा प्रयोग भाजपच्या राज्यासह दिल्लीतील नेत्यांच्या मनात धडकी भरवणारा होता. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे भाजपने हे सरकार पाडले. त्यासाठी भाजपने आधी शिवसेना फोडली. त्यानंतर दीड वर्षाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. अशोक चव्हाण यांना काँग्रेसने दोन वेळा मुख्यमंत्री केले होते. त्यांचे वडील दिवंगत शंकरराव चव्हाण हेही दोनदा मुख्यमंत्री राहिले होते, केंद्रात अनेक महत्त्वाची मंत्रिपदे त्यांनी सांभाळली होती. तरीही अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.
शरद पवार संपल्याचा पुनरुच्चार….
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अस्तित्वच नाही, अशीही टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकलूज येथे केली. फडणवीस यांना जो मनःस्ताप होतोय, त्याला कारणीभूत शरद पवार आहेत. पवारांच्या एकाच खेळीचा खरेतर फडणवीस यांनी इतका त्रागा करून घ्यायला नको होता. मोहिते पाटील यांनी दिलेला धक्का भाजपच्या जिव्हारी लागला आहे. भाजपमधूनही दिग्गज नेते बाहेर पडू शकतात, असा संदेश ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यभरात गेला. त्यापाठोपाठ अजितदादा पवार गटाचे नेते उत्तम जानकर हेही शरद पवारांसोबत आले आहेत. मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचे गेल्या अनेक वर्षांचे वैर होते. त्यावर आता पडदा पडला आहे. या सर्व घडामोडींमुळे माढा, सोलापूर आणि बारामती मतदारसंघातील समीकरणे बदलण्यास मदत होणार आहे, असे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे आणि हे सर्व घडत आहे 83 वर्षीय शरद पवार यांच्यामुळे. असे असतानाही पवारांचे अस्तित्व नाही, अर्थात पवार संपले याचा देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला आहे.