मुंबई : ‘मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर नेमकं कोणत्या गुन्ह्याअंतर्गत अटक होईल, याबाबतची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही. पण केंद्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन आखण्यात आल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी नेमके कोणाचे प्रयत्न सुरु आहेत? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. ठाण्यात आगामी काळात महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घडामोडी घडणार आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

अधिक वाचा  नगरमध्ये लंके की सुजय विखे, कोणाला मतदान द्यायचं? अण्णा हजारेंनी मतदारांना दिला संदेश, म्हणाले…

“मी धक्कादायक माहिती महाराष्ट्राला देऊ इच्छितो. केंद्रातील काही अधिकाऱ्यांनी मला सूचक माहिती दिलीय. ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या कानावर घातलंय की, कुठल्याही परिस्थितीत तुला अटक केली जाईल”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

‘काही महिने आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलाय’

“निदान ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत आणि त्यानंतरचे काही महिने तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. तसं माझ्या विरोधात एकही केस नाही. पण ही जेव्हा बातमी येते तेव्हा आश्चर्य वाटतं”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.

जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
या सर्व घडामोडींच्या दरम्यान जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत. याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत मला अटक होऊ शकते, असं म्हटलं होतं. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जितेंद्र आव्हाड याबाबत काही चर्चा करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.