बंगळुरू : कर्नाटकमध्ये पाच उपमुख्यमंत्री  बनवण्याची तयारी भाजपनं सुरु केल्याची माहिती आहे. कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा दिल्यानंतर नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सध्या दिल्ली दौऱ्यावर असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. त्यानंतर याबाबतचं धोरण निश्चित होईल असं सांगितलं जात आहे.

भाजप इलेक्शन मोडमध्ये

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यापासूनच भाजपनं 2023 च्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. येडियुरप्पांना पदावरून पायउतार करणे आणि त्यांच्या जागी दुसरा लिंगायत समाजातील नेता पदावर बसवणे, हा भाजपच्या निवडणूक रणनितीतला पहिला भाग होता. आता नव्या सरकारमध्ये पाच जणांना उपमुख्यमंत्रीपद देऊन पुढील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपनं तयारी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.

अधिक वाचा  एनआयएचे पथक पुण्यात दाखल, दहशतवाद्यांच्या चौकशीनंतर पथकाची धडाकेबाज कारवाई

मंत्रिमंडळाचं स्वरूपही बदलणार

बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्र्यांचा समावेश असेल. त्याचबरोबर सध्याच्या मंत्रिमंडळात बदल करून 6 ते 8 नव्या मंत्र्यांना जागा मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये जास्तीत जास्त 34 मंत्री होऊ शकतात. जातीय समीकरणांचा विचार करून नव्या मंत्रिमंडळाची रचना केली जाणार आहे. त्यामुळे काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याचीही शक्यता आहे.

उपमुख्यमंत्रीपदाचं रेकॉर्ड

बसवराज बोम्मई यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाल्यानंतर कर्नाटकात 4 उपमुख्यमंत्री होऊ शकतील, अशी चर्चा होती. आता 5 जणांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार असल्याचं समोर येत आहे. यापूर्वी आंध्रप्रदेशमध्येदेखील मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या 2019 साली अस्तित्वात असलेल्या सरकारमध्ये 5 उपमुख्यमंत्री आहेत. या विक्रमाची कर्नाटकात बरोबरी होणार आहे.