मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले हे पहिल्यापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. नाना पटोले यांनी आता राजीनामा दिल्याने, त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी निश्चित मानली जात आहे. मात्र नाना पटोलेंचा राजीनामा किंवा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती ही केवळ काँग्रेस पक्षापुरती मर्यादित बाब राहिलेली नाही.

या घडामोडीचा परिणाम महाविकास आघाडीवर होत आहे. कारण नाना पटोले यांनी सोडलेलं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला देऊ केल्याची चर्चा आहे. त्याबदल्यात काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे. या केवळ चर्चाच आहेत. मात्र सेना-काँग्रेसमध्ये जर खलबतं होत असली, तरी राष्ट्रवादी शांत कशी बसेल?

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. “विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते खुलं झालं आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल”, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार, असे संकेत मिळत आहेत.

विधानसभा अध्यक्षपद तो बहाना, मुख्यमंत्रिपदावर निशाणा?
सत्तास्थापनेच्या सूत्रानुसार काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद गेलं. ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला तर उपमुख्यमंत्री, अर्थ, गृह ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला मिळाली. 2019 मधील विधानसभा निकालानुसार, भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा कमी होत्या. मात्र अपक्षांसह शिवसेनेने आपलं संख्याबळ 60 पर्यंत वाढवलं. तरीही महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडे सर्वाधिक 16 मंत्रिपदं आहेत. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदासह 14 आणि काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षांसह 12 खाती आहेत.

अधिक वाचा  मोठी बातमी! लोकसभा रणधुमाळीतच महाराष्ट्रात पुन्हा आणखी एका निवडणुक; हे आमदार पुन्हा कामाला?

सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, कोण कोणत्या पदावर दावा सांगेल हे सांगता येत नाही. जरी शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरुन भाजपशी काडीमोड घेतल्यामुळे शिवसेने मुख्यमंत्रीपद सोडेल या चर्चेत तथ्य नाहीच. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांची यापूर्वी विधानं पाहता, विधानसभा अध्यक्षपद तो बहाना, मुख्यमंत्रिपदावर निशाणा? अशी आहेत.

जयंत पाटलांचं वक्तव्य
नुकतंच जयंत पाटील यांनी सांगलीत मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं भाष्य केलं होतं. “गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे”, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. इस्लामपूर येथे एका कार्यक्रमासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी एका स्थानिक चॅनेलशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड केलं होतं.

अधिक वाचा  रोहितसोबत सलामीला कोण, किती अष्टपैलू? टी20 विश्वचषकासाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले…?
मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी जास्त संख्याबळाची, पक्षवाढीची गरज असते. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. मला हे माहितीय की आमच्याकडे 54 आमदार आहे. 54 आमदारांचा कसा मुख्यमंत्री होणार? त्यासाठी पक्षवाढीची अतोनात गरज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीकडे सध्या किती खाती? राष्ट्रवादीचे मंत्री

अजित पवार (उपमुख्यमंत्री) – बारामती (पुणे)
दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे)
धनंजय मुंडे – परळी (बीड)
अनिल देशमुख – काटोल (नागपूर)
हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर)
राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा (बुलडाणा)
नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई)
राजेश टोपे – उदगीर (लातूर)
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे)
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा)
दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे)
आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड)
संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर)

अधिक वाचा  विकसीत, सुरक्षित आणि पर्यावरणपुरक पुण्याचे संकल्पपत्र

यापूर्वी जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधी?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. मात्र हे पद अद्याप राष्ट्रवादीला मिळालं नाही. यापूर्वी 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या होत्या. तरीही त्यावेळी शरद पवारांनी पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडून, अर्थ, गृह, उपमुख्यमंत्रिपद यासारखी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे ठेवली होती.

त्यानंतरच्या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादीने काँग्रेससोबत निवडणुका लढवून, 2009 मध्ये पुन्हा सत्ता काबिज केली. पण त्यावेळीही राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा कधी आणि कशी पूर्ण होणार, हे येत्या काळात स्पष्ट होऊ शकतं.