मुंबई: मनोज जरांगे पाटील २६ जानेवारी रोजी मुंबई मध्ये उपोषण करण्यासाठी येत आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव त्यांच्यासोबत मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. या सर्व आंदोलकांना मराठा समाज बांधवांच्यावतीने रसद पुरवली जात आहे. मुंबईमध्ये मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याचा कस लागणार आहे. शहरातील सेवा सुविधांवर ताण तर येणारच आहे, मग अशा परिस्थितीत आंदोलनकर्त्यांना पर्यंत जेवण पुरवणे हे एक आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी“ डबेवाला रोटी बॅन्क”सरसावली आहे. ज्या मराठा समाज बांधवांना आंदोलनकर्त्यांना जेवण द्यायचे असेल व त्यांच्याकडे वाहतुकीची काही सोय नसेल तर त्यांनी डबेवाला रोटी बॅन्कच्या 8424996803 या हेल्प लाईन नंबर वर संपर्क साधावा. डबेवाला रोटी बॅन्कची गाडी आपल्याकडे येईल आणि ते अन्न घेऊन आंदोलनकर्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल. वाहतुकीची समस्या लक्षात घेता ही सुविधा फक्त दक्षिण मुंबई पुरती मर्यादित राहील.

अधिक वाचा  मनोज जरांगेंचे मुस्लिम मराठा दलित ‘ऐक्य’चे गणितं कोथरूडचे चित्रं बदलवणार? ही भेट चर्चेत!

मुंबईतील डबेवाला कामगार हा मराठा आहे. आपले काम ही ईश्वर पूजा आहे, असे मानून तो मुंबईत काम करतो. आर्थिकदृष्ट्या तो गरीब आहे. पण मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत आला आहे. त्याला आपला पण मदतीचा काही हातभार, खारीचा वाटा का होईना, पण त्यात असला पाहीजे असे त्याला वाटते, अशी भावना डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी बोलून दाखवली.

२६ जानेवारीपासून माझ्यासारखे अनेक डबेवाले कामगार घराच्या बाहेर कामावर जाताना एक नव्हेत तर दोन डबे सोबत घेऊन बाहेर पडणार आहेत. एक डबा मी खाईल आणि एक डबा जेथे भुकेला मराठा आंदोलक दिसेल, तेथे त्याला डबा खाऊ घालणार आहे, असे कैलास शिंदे या डबेवाल्याने सांगितले. कैलास शिंदे यांच्यासारखे शेकडो डबेवाले आपल्यासोबत अतिरिक्त डबा आणणार आहेत. यासोबत डबेवाला रोटी बँकेच्या गाड्या २४ तास अन्न पुरवण्याची सेवा देणार आहे. उद्देश एकच आहे की मुंबईत कोणीही मराठा समाज बांधव उपाशी राहू नये, असे सुभाष तळेकर यांनी सांगितले.