नवी दिल्ली : काँग्रेसचा राजीनामा देणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी जाहिररित्या भाजपचमध्ये प्रवेश केलाय. यावेळी त्यांच्यासोबत भाजप पक्षाध्यक्ष जे पी नड्डा हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी, ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांचे आभार मानले. तर कमलनाथ सरकारवर टीका करत ‘कमलनाथ सरकारनं घोर निराशा केल्याचं’ ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं. विजयाराजे यांचे नातू भाजपमध्ये आले याचा आनंद असल्याचं यावेळी जे पी नड्डा यांनी म्हटलं.
व्यक्तीच्या आयुष्यात अनेक वळणं येतात ज्यामुळे व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यचं बदलून जातं. माझ्या आयुष्यात असेल दोन दिवस आले. माझ्या आयुष्यात असा पहिला दिवस होता ३० सप्टेंबर २००१… या दिवशी मी वडिलांचं छत्र हरवलं… आणि दुसरा दिवस १० मार्च २०२०, या दिवशी माझ्या वडिलांचा ७५ वा वाढदिवस होता… असं म्हणताना ज्योतिरादित्य भावुक होताना दिसले. मंगळवारी ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
‘काँग्रेस वास्तविकतेपासून दूर जातेय’
माझ्या वडिलांनी आणि मी नेहमीच देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेश सरकार भ्रष्टाचारानं ग्रासलेला आहे असं म्हणतानाच ‘काँग्रेसमध्ये नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही’ असा आरोपही त्यांनी केला. आज निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मन दु:खी आहे. जनसेवेचं लक्ष्य आज काँग्रेसकडून पूर्ण होऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं. ‘काँग्रेस वास्तविकतेपासून दूर जातेय’ अशी टीकाही शिंदे यांनी यावेळी केली.
‘मोदींच्या हाती देशाचं भविष्य सुरक्षित’
सोबतच, देशाच्या इतिहासात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला जनादेश आजवर कुणालाही मिळालेला नाही. भारताचं भविष्य नरेंद्र मोदींच्या हाती सुरक्षित आहे. त्यांनी भारताचं नाव जगात पोहचवलं आहे. मोदींनी मला देशाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपचे आभार मानले.