मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या भावावरून भाजपला टोला हाणणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपनं त्यांच्याच शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘वेलकम राहुलजी, तुमची सुट्टी मजेत गेली असेलच’, असं खोचक ट्विट भाजपनं केलं आहे. मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान कार्यालयाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या उतरत्या भावाची आठवण करून दिली होती.
‘मध्य प्रदेशात लोकांनी निवडून दिलेलं सरकार तुम्ही अस्थिर करत असताना तेलाच्या किंमती ३५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्याकडं बहुतेक तुमचं दुर्लक्ष झालं असावं. कृपया पेट्रोलच्या किंमती लिटरमागे ६० रुपयांच्या खाली आणून सर्वसामान्य भारतीयांना दिलासा द्याल का? त्यामुळं ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा चिमटा राहुल यांनी भाजपला काढला होता.
राहुल गांधी यांच्या या टीकेला महाराष्ट्र भाजपनं ट्विटच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधीजी तुमचं स्वागत आहे. तुमची सुट्टी मजेत गेली असेल अशी आशा आहे. तुम्ही देशाबाहेर असताना महाराष्ट्रात तुमच्या आघाडी सरकारनं पेट्रोल व डिझेलवर १ रुपया अधिभार (Green Cess) लावण्याचा निर्णय घेतलाय. कदाचित उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाबाबत काँग्रेसला विचारलं नसावं,’ असं टोला भाजपनं हाणलाय.