नवी दिल्ली : संसदेच्या सत्रात सहभागी होण्यासाठी दाखल झालेले राहुल गांधी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्याबद्दल विचारण्यात आलेले प्रश्न टाळताना दिसले. परंतु, काही मिनिटांतच त्यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजप सरकारवर निशाणा साधला. जनतेनं निवडून दिलेलं काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोप, या ट्विटमधून राहुल गांधी यांनी केलाय. यापूर्वी राहुल गांधींनी लोकसभा परिसरातच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत मध्यप्रदेशच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचं समजतंय.
‘जनतेनं निवडून दिलेल्या काँग्रेस सरकारला अस्थिर करण्यासाठी तुम्ही व्यग्र असताना कदाचित जागतिक स्तरावर तेलाच्या किंमतीत ३५ टक्क्यांनी झालेली घट विसरली असाल. कृपया, पेट्रोलच्या किंमती ६० रुपयांपर्यंत कमी करून भारताच्या नागरिकांपर्यंत याचा फायदा पोहचवू शकता का? यामुळे अर्थव्यवस्थेला उभारणी मिळेल’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय.
दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये राजकीय नाटकाचा दुसरा अंक सुरू झालाय. काँग्रेसचे जवळपास २० आमदार अगोदरपासूनच बंगळुरूच्या एका हॉटेलमध्ये आहेत. त्यांना आता जयपूरला हलवण्यात येणार आहे. आता भाजपनंही आपल्या आमदारांना मानेसरला हलवलंय. ज्योतिरादित्य शिंदे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येतंय.
काँग्रेसच्या २० हून अधिक आमदारांनी राजीनामा दिल्यानं मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार कोसळण्याची चिन्हं निर्माण झालंय. परंतु, काँग्रेसकडून मात्र सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा करण्यात येतोय.