कल्याण शहरात सध्या गुन्ह्यांच्या घटना खूप वाढल्या आहेत. त्याचदरम्यान आता शहरातीन चोरीचा एक अजब गुन्हा समोर आला आहे. अधिकृत वाईन शॉपमधील लाखोंच्या मद्याच्या बाटल्या चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत आली होती. त्याप्रकरणी शोध घेऊन पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपींपैकी एक हा त्याच वाईन शॉपमध्ये कामाला होता. फक्त दारूच्या बाटल्या चोरी करता याव्यात म्हणूनच तो या दुकानात कामाला लागला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याचे सहकारी दुकानात ग्राहक बनून दारू खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्यावर त्यांना दुकानातील माल चलाखीने सोपवायचा. कल्याण गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चौघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

अधिक वाचा  विशाल पाटलांना तिकीट न मिळण्याच्या खेळीतील खलनायक जयंत पाटील; ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप

काय आहे प्रकरण ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथे अनिलकुमार भगवानदास बजाज यांचे मद्यविक्रीचे अधिकृत दुकान आहे. या दुकानातून गेल्या काही महिन्यांमध्ये एक ते दोन मद्याच्या बाटल्या अशा पद्धतीने एकूण सहा लाख ४० हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या चोरीला गेल्या होत्या. दारु विक्रीचा हिशोब जुळून नसल्याने याप्रकरणी दुकानदार अनिलकुमार बजाज यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. मात्र हा गुन्हा दाखल होताच त्याच दुकानात काम करणारा सुनील नावाचा इसम फरार झाला होता.

याप्रकरणाचा तपास करताना कल्याण गुन्हे शाखेचे हवालदार गोरक्ष शेकडे यांना एक खबर मिळाली. या मद्य चोरीतील एक आरोपी सुनील हा उल्हासनगर येथे येणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्ताराम भोसले, गोरक्ष शेडगे, गुरुनाथ जरग, बालाजी शिंदे, विलास कडू, दीपक महाजन, चालक अमोल बोरकर यांच्या पथकाने शनिवारी उल्हासनगर परिसरात सापळा लावला. ठरल्या वेळेत आरोपी सुनील त्या भागात येताच पोलिसांनी झडप घालून त्याला अटक केली.

अधिक वाचा  मागच्या जन्मात मी बंगालमध्ये जन्मलो असेल… पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं असं का म्हणाले?

चोरीसाठी वाईन शॉपमध्ये नोकरीला लागला अन्

तपासादरम्यान सुनीलने त्याचा गुन्हा कबूल केला. जी.के. या वाईन्स दुकानातून चोरून नेलेल्या महागड्या मद्याच्या बाटल्या इतर आरोपींसोबत संगनमत करून कल्याण, डोंबिवली परिसरातील ढाबे मालकांना विकल्याचेही त्याने सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अंबरनाथ, उल्हासनगर भागातून अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेला लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे सुनील हा त्याच दुकानात काम करत होता. किंबहुना ही दारू चोरता यावी यासाठीच त्याने वाईन शॉपमध्ये नोकरी करण्यास सुरूवात केली होत. सुनीलचे इतर साधीदार आरोपी हे दारू खरेदी करण्याच्या बहाण्यान दुकानात यायचे. आणि तेव्हा सुनील हा चलाखीने त्यांना दुकानाचा माल थैलीत भरून त्यांना देत होता. आत्तापर्यंत आरोपींनी 6 लाख 40 हजार रुपये किमतीची दारू बाहेर विकली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.