राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरूवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार असून 9 मार्चला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाची सर्वांनाच उत्सुकता आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले. अनेक वेळा कामकाज तहकुब करावं लागलं होतं. सभागृहात अनेक वेळा सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण होतात.
याच पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सभागृहात शिस्तीचे खडे बोल सुनावले. तर दुसरीकडे सभागृहाचे कामकाज शिस्तीत आणि नियमात चालवावे यासाठी विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सूचना केली. मात्र, तरी देखील काहीसे आरोप-प्रत्यारोप सभागृहात पाहायला मिळाले. दरम्यान, विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. उद्या सकाळी ११ वाजल्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होणार आहे. त्यामुळे उद्या देखील सभागृहात काय-काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.