राम मंदिर सोहळ्याच्या आडून भाजपने लोकसभेसाठी रणशिंग फुंकले असतानाच आता काँग्रेसनेही  एकाचवेळी दोन मेगा प्लॅन करत तयारीसाठी शड्डू ठोकला आहे. इंडिया आघाडीमधील मित्रपक्षांना न दुखावता काँग्रेसकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या 52 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं आहे. तसेच 2019 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या 209 लोकसभा मतरदारसंघांसह एकूण 261 मतदार संघात काँग्रेसने थेट लक्ष केंद्रित केले आहे. पक्षांतर्गत सर्वे तसेच वेगवेगळ्या प्रकारे मित्रपक्षांना न दुखावता उमेदवारांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे.

आठ राज्यात 100 प्लस जागा जिंकण्यासाठी प्रयत्न 

दुसऱ्या टप्प्यामध्ये आठ राज्यात प्रादेशिक पक्ष प्रभावी नसल्याने काँग्रेसची थेट लढत भाजपशी आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राज्यस्थान, गुजरात, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल, कर्नाटक व आसाम राज्यांचा सहभाग आहे. या राज्यातील 142 लोकसभेच्या जागा येतात. सध्या याठिकाणी भाजपचे 130 खासदार आहेत. तुलनेत काँग्रेसकडे फक्त 7 खासदार आहेत. त्यामुळे या आठ राज्यांमध्ये 100 प्लस लोकसभा जागा जिंकण्यासाठी प्रयत्न काँग्रेस करणार आहे.

अधिक वाचा  तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा, अमोल कोल्हेचे अजित दादांना खुले आव्हान

पक्ष 291 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार 

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीमधील जागा वाटप करण्यापूर्वी, काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीने 29 आणि 30 डिसेंबर रोजी मॅरेथॉन विचारमंथन सत्र आयोजित केले होते. यामध्ये पक्षाने 10 राज्यांतील प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांना सांगितले की, पक्ष 291 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस इंडिया आघाडीकडून 85 जागांची मागणी करणार आहे. लोकसभेचे चित्र लक्षात घेऊन इंडिया आघाडी जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही

आघाडीतील पक्षांशी समन्वयाचे काही मापदंड काँग्रेसने ठेवले आहेत. त्यानुसार गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या लोकसभेच्या जागांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. 2014 पासून झालेल्या दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या आधारे पक्ष जागा मागणार आहे.

अधिक वाचा  पवार विरुद्ध पवार लढाईत आत्ता ‘हमरी तुमरी’ही? थेट आईवर अजितदादांचं भाष्य, रोहित पवारांचंही तसंच उत्तर

काँग्रेस कमी जागांवर उमेदवार उभे करणार

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 375 पेक्षा जास्त जागा लढवणार हे निश्चित आहे. 2014 च्या निवडणुकीत 464 आणि 2019 मध्ये 421 उमेदवार उभे केले होते. 2014 मध्ये काँग्रेसचे उमेदवार 224 जागांवर दुसऱ्या तर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते. जिंकलेल्या जागांची संख्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या आधारे काँग्रेस इंडिया आघाडीच्या प्रभावाखाली असलेल्या राज्यांमध्ये 85 पेक्षा जास्त जागांवर दावा करेल. उर्वरित राज्यांमध्ये 291 जागांवर एकटाच निवडणूक लढवणार आहे.

14 जानेवारीपूर्वी जागा वाटप

अधिक वाचा  किराणा दुकानातून तब्बल 4 कोटी 50 लाखांचं ड्रग्ज जप्त, दुकानदाराला अटक

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे याच आठवड्यात  इंडिया आघाडीच्या उर्वरित नेत्यांशी चर्चेसाठी आपला प्रतिनिधी ठरवतील. राष्ट्रीय समिती आपला अहवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सादर करणार आहे. खरगे यांनी 4 जानेवारीला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेत्यांची बैठक बोलावली आहे. पक्षाच्या निवडणूक जाहीरनामा समितीची बैठकही त्याच दिवशी होणार आहे. 14 जानेवारीपासून राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेपूर्वी जागांचे वाटप केले जाईल.