नवी दिल्ली : जगभरातील देशांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये हाहाकार उडाला आहे. इटलीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याने अवघ्या 24 तासांत 1266 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच 24 तासांत कोरोनाने बाधित होणाऱ्यांची संख्या 2116 एवढी आहे.
चीनपासून सुरू झालेला कोरोना व्हायरस आता युरोपमध्ये पोहोचला आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये या व्हायरसने धुमाकूळ घातला असून इटलीतील स्थिती तर दिवसेंदिवस खराबच होत चालली आहे. या रोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही इटली मोठ्या प्रमाणात आहे.
दरम्यान, ब्राझील, कॅनडा आणि अमेरिका असे अनेक देशांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी स्वत:ला घरातच कोंडून घेतलं आहे. याबाबत त्यांच्या कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे. ट्रुडो यांच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील एका कार्यक्रमात भाषण केलं होतं. त्यानंतरच त्यांना कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे आढळून आली होती.
ब्राझील सरकारचा जो अधिकारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटून गेला होता, तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं चाचणीतून समोर आलं आहे. याबाबत ब्राझीलमधील ‘एस्ताडो दे साओ पाउलो’ या वर्तमानपत्राने वृत्त दिलं आहे. मात्र असं असलं तरीही मी कोरोनाच्या लागण होण्याबाबत चिंतित नाही, असं ट्रम्प म्हणाले आहेत. तसंच मागील गुरुवारी ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सेनारो यांच्यासोबत भोजन केल्यानंतर कोरोनाची लागण होण्याची कोणतीही भीती नाही, कारण त्यांनी काहीही असामान्य केलं नाही, असंही ट्रम्प म्हणाले.