नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच राज्यातील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर मराठा आरक्षणाबाबत भाष्य करताना या विषयावर नक्की तोडगा निघेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रात मंत्री झालेल्या नारायण राणे यांना पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. यावेळी राणे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मी मंत्री बनलो आहे त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते जी जबाबदारी देतील ती मी चांगल्या प्रकारे पार पाडेन.”

अधिक वाचा  उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 1999 पासूनच…जनहितापेक्षा त्यांना पद महत्त्वाचं!

आजवरच्या राजकीय प्रवासाबाबत विचारलेल्या प्रश्नावर राणे म्हणाले, “आज सांगताना आनंद वाटतो की, सुरुवातीला मुंबई महापालिकेत १९८५ मध्ये नगरसेवक झालो. त्यानंतर BEST चा चेअरमन झालो. पुढे आमदार, मुख्यमंत्री, खासदार आणि आता केंद्रीय मंत्री झालो आहे, याचं सगळं श्रेय मी पंतप्रधान मोदींना देतो. भाजप जी जबाबदारी देईल ती पूर्ण करण्याची मी प्रयत्न करेन.”

मराठा आरक्षणावर नक्की तोडगा निघेल – राणे
मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारकडेच असल्याच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रात मंत्री झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी काय करणार? या प्रश्नावर राणे म्हणाले, “मराठा आरक्षणाबाबत नक्की तोडगा निघेल, त्यासाठी माझा कायमच पाठिंबा राहणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेला शह देण्यासाठी मंत्रीपद दिलं का? हा प्रश्न टोलवताना शिवसेनेला शह देण्यासाठी की इतर कशासाठी मला मंत्रीपद दिलं याचं कारण आपल्यालाच माहिती नाही. शपथ तर मी घेतलीए,” अशा शब्दांत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. तसेच ज्येष्ठतेच्या प्रोटोकॉलप्रमाणं मला पहिल्यांदा शपथ घेण्याची संधी देण्यात आली असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.