अदानी उद्योग समूहाचे गौतम अदानी यांनी गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. या भेटीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने काही दिवसांपूर्वीच मोर्चा काढला होता. या मोर्चावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे कौतुक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बारामती येथील टेक सेंटरच्या निर्मितीत २५ कोटींच्या योगदानाबद्दल शरद पवार यांनी अदानी यांचे आवर्जून आभार मानले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान गौतम अदानी हे ‘सिल्व्हर ओक’वर पोहोचले.

अधिक वाचा  तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा, अमोल कोल्हेचे अजित दादांना खुले आव्हान

शरद पवारांकडून अदानींचे कौतुक

विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटकपक्ष सातत्याने उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात भूमिका घेत असताना दुसरीकडे शरद पवार यांनी गौतम अदानी यांची नेहमी पाठराखण केल्याचे दिसून येत आहे. राहुल गांधी यांनी संसदेच्या संयुक्त समितीच्या माध्यमातून उद्योगपती गौतम अदानी यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, राहुल यांच्या या मागणीला शरद पवारांनी विरोध केला होता. त्यामुळे इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाकडून सातत्याने अदानींना लक्ष्य करण्यात येत असतानाही शरद पवारांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.