चिंचवड मतदारसंघ जिंकून भाजपला त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धोबीपछाड देण्यासाठी विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवारांनी डाव टाकला होता. पण फडणवीसांनी हा डाव वेळीच ओळखत हा गड ‘शाबूत’ राखण्यासाठी अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंची मते निर्णयाक ठरविण्याच्या इराद्याने कलाटेंना लढाईसाठी राजी केले, उमेदवारी अर्ज भरायला भाग पाडले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पवारांच्या विनवण्यानंतरही कलाटेंना रिंगणात ठेवले, एवढेच नाही; तर कलाटेंच्या प्रचाराचा धडाका कायम ठेवला.त्याकरिता आवश्‍यक ती सर्व मदत करण्यात आली. हे सारे घडवून आणण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या सहकाऱ्याची मदत फडणवीस यांना झाल्याचे आता समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका विश्वासू सहकाऱ्याने चिंचवडच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड काबीज करण्यासाठी निघालेल्या पवारांचा ‘गेम’ यशस्वी होऊ शकला नाही, असे या सूत्रांनी सांगितले. कलाटेंच्या बंडखोरीआडून चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पराभव दाखविण्यात फडणवीसांची खेळी यशस्वी झाली.

अधिक वाचा  AI फीचर्सचा Google Pixel 8a मैदानात सगळ्यांना बुचकळ्यात टाकले; एवढी किंमत तर ग्राहकांना ही सूट

चिंचवडची जागा भाजपकडून खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीने प्रामुख्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रचंड ताकद लावली होती. भाजपच्या अश्विनी जगताप यांचे आव्हान मोडीत काढून या मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा रोवण्यासाठी पवारांनी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आघाडीची व्यूहरचना लक्षात घेऊन चिंचवडमध्ये धोका होऊ नये, याकरिता भाजप-शिवसेनेनेही (शिंदे गट) डावपेच आखून, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहुल कलाटेंच्या ताकदीचा पुरेपूर फायदा करून घेण्याची चाल सत्ताधाऱ्यांनी केली. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत लाखापेक्षा अधिक मते घेतल्याचे आकडे मांडून पोटनिवडणूक लढविण्यावर कलाटे ठाम होते.

अधिक वाचा  माळवाडी, आमदाबाद गावांत आढळराव पाटलांचे जल्लोषात स्वागत

आघाडीच्या जागावाटपात चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिल्याने कलाटे यांनी त्यांच्याकडेही तिकिट मागितले. परंतु पवारांनी काटेंना पसंती दिली. परंतू नाराज कलाटेंना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून आघाडीच्या मतांची विभागणी होऊन जगतापांचा मार्ग सोपा करण्यासाठी भाजपने हालचाली केल्या. मात्र, अशा प्रकारच्या राजकीय खेळीला कलाटेंनी सुरवातीला नकार दिला.

जगताप यांचा मार्ग सुकर करण्यासाठी कलाटे या स्पर्धेत राहणे आवश्‍यक होते. त्यामुळे कलाटेंचे मन वळविण्यासाठी फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या एका विश्‍वासू सहकाऱ्याकडे ही जबाबदारी सोपविली. निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी कलाटेंना या सहकाऱ्याने तयार केले आणि विश्वासही दिला. या सहकाऱ्याच्या कलाटेंशी असलेल्या मैत्रीचा फायदा यावेळी झाला. त्यानंतर कलाटे लढण्यावर ठाम झाले. कलाटेंना पडद्याआडून मोठी ताकद देऊन शिंदेंच्या या सहकाऱ्याने चिंचवडच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली.

अधिक वाचा  हैदराबादमध्ये जाऊन नवनीत राणांच ओवैसींना ओपन चॅलेंज; ‘फक्त 15 सेकंदांसाठी…’

दिवगंत आमदार लक्ष्मण जगतापांच्यामागे भाजपला अगदी जगताप कुटुंबियांनाही चिंचवड पुन्हा जिंकताना नाकीनऊ येणार असल्याचे हेरून चिंचवडच्या मिशनसाठी या खास सहकाऱ्याला कामाला लावण्यात आले. अजित पवार यांची खेळी उधळवून लावण्यात फडणवीस यांना मोलाची मदत करणारा मुख्यमंत्री शिंदे यांचा खास सहकारी कोण याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.