मुंबई : रोजंदारीवर काम करणारे पाच भारतीय दर तासाला आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या मित्राच्या संपत्तीत दर तासाला 85 कोटींची भर पडत आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. NCRBR ने नुकताच आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या अहवालानुसार भारतात रोज 450 लोक आत्महत्या करत आहेत. तर आजच जाहीर झालेल्या ब्लूमबर्गच्या इंडेक्स नुसार उद्योगपती गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. हाच धागा पकडत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.

अधिक वाचा  मोहोळांच्या प्रभावी यंत्रणेचा यशस्वी टप्पा पार; 2 लाख पुणेकरांना ‘व्होटिंग स्लिप’ पोहचं

राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. “रोजंदारीवर काम करणारे पाच भारतीय दर तासाला आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या मित्राच्या संपत्तीत दर एका तासाला 85 कोटींची भर पडत आहे. पंतप्रधानांचे एकच काम, मित्रांना श्रीमंत करण्यासाठी सामान्य माणसांची लूट करणे. सुटा बुटातील मोदी सरकारचे त्यांच्या मित्रांसाठी अच्छे दिन आले आहेत. नवीन भारत, मित्रांचा नवीन इंडिया, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.एनसीआरबीरच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. 2021 मध्ये भारतात तब्बल 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. 2020 मध्ये ही संख्या 1,53,052 होती. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये 7.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या वर्षी आत्महत्यांचे प्रमाण 6.2 टक्क्यांनी वाढले आहे. देशात एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

अधिक वाचा  डॉ. अमोल कोल्हेंना राज्यात मोल…!

अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या नव्या आकडेवारीनुसार गौतम अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गौतम अदानी हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टेस्लाचे मालक एलॉन मस्क आणि अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांच्या मागोमाग आहे. गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड अर्नाल्ट यांनाही मागे टाकलं आहे. हेच दोन्ही धागे पकडत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.