नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरणामुळे दीड लाख कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप झेलणाऱ्या सत्ताधारी आपने भाजपवर उलटवार केला आहे. खरा गैरव्यवहार ‘ऑपरेशन लोटस”चा असून आपच्या आमदारांना फोडण्यासाठी प्रत्येकी २० कोटी रुपयांचे आमिष दाखविले जात आहे. ४० आमदारांना फोडण्यासाठी भाजपने ८०० कोटी रुपये तयार ठेवले असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

मद्य धोरण गैरव्यवहारावरून दिल्लीतील सत्ताधारी आप आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपमध्ये जुंपली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या मालमत्तांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे घातले. त्यानंतर केजरीवाल सरकार पाडण्यासाठी आमदारांना फोडण्याचे प्रयत्न भाजपने चालविल्याचा आपचा आरोप आहे. यामागे भाजपचे ‘ऑपरेशन लोटस” असल्याचाही दावा आपचे नेते करीत आहेत. त्यापार्श्वभूमीवर गुरुवारी आपच्या आमदारांची तातडीची बैठक केजरीवाल यांनी बोलावली होती. या बैठकीत आपचे नऊ आमदार सहभागी झाले नसल्याने तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, सर्व आमदार अखेरच्या श्वासापर्यंत केजरीवाल यांच्यासोबत असल्याचा खुलासा आपतर्फे करण्यात आला.

अधिक वाचा  पुण्यात 45 वर्षानंतर ‘या’ ठिकाणी घुमणार पंतप्रधानाचा आवाज अन् शहरात फक्तं रोड शो; यामुळे ठिकाण बदललं

बैठकीला ६२ पैकी ५३ आमदार उपस्थित राहिल्याची माहिती देणारे आणि ‘ऑपरेशन लोटस” अपयशी ठरल्याचा दावा करणारे ट्विट आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी केले. विधानसभेचे सभापती परदेश दौऱ्यावर, तर सिसोदिया हिमाचल प्रदेशात आहेत. उर्वरित आमदारांशी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे बोलणे झाले असून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केजरीवाल यांच्यासोबत राहण्याची ग्वाही दिल्याचेही भारद्वाज यांनी नमूद केले. आपचे राज्यसभेतील गटनेते संजयसिंह यांनीही ऑपरेशन लोटस” अपयशी झाल्याचे ट्विट केले.

या बैठकीनंतर केजरीवाल यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सिसोदिया यांना प्रामाणिकपणाचे प्रशस्तीपत्र दिले. सोबतच भाजपवर कडाडून हल्लाही चढविला. ते म्हणाले, आपचे ४० ते ४५ आमदारांना फोडून सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे. परंतु एकही आमदार फुटला नाही. देशात सरकार पाडण्याचे वातावरण असून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोव्यातील सरकारे पाडण्यात आली. आता झारखंडचे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिहारमध्ये काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे आता दिल्लीचे सरकार पाडण्यास निघाले आहेत. असे का केले जात आहे?

अधिक वाचा  मतमोजणीपूर्वीच भाजपने खाते उघडले, आतापर्यंत निवडणुकांमध्ये किती खासदार झाले बिनविरोध

आकडेवारीवरून भाजपची खिल्ली

गैरव्यवहाराच्या आकेडवारीवरून केजरीवाल यांनी भाजपची खिल्ली उडवली. ‘दीड लाख कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. प्रत्यक्षात दिल्लीचा अर्थसंकल्प ७० हजार कोटी रुपयांचा आहे. मात्र हा नेमका गैरव्यवहार काय आहे हे भाजपच्या नेत्यांना सांगता येत नाही,‘ असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, की भाजपचा एक नेता आठ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे म्हणतो, तर भाजपच्या दोन नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अकराशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचा दावा केला. नायब राज्यपालांनी १४४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल दिला. ”सीबीआय”ने गुन्हा नोंदवताना त्यात एक कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचे म्हटले आहे. खरोखर काही गैरव्यवहार आहे की सारे काही तथ्यहीन आहे..

अधिक वाचा  मागच्या जन्मात मी बंगालमध्ये जन्मलो असेल… पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं असं का म्हणाले?

आपच्या ४० आमदारांसाठी ८०० कोटी रुपये भाजपने तयार ठेवले आहेत. ही रक्कम जीएसटीची आहे, पीएमकेअरची आहे की कोणत्या मित्राने दिली आहे?

– अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री