‘बेबी डॉल’ फेम गायिका कनिका कपूरला करोना झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कनिका लंडनहून परतल्यावर ती लखनऊच्या ताज हॉटेलमध्ये थांबली होती. तिने तेथे एका पार्टिला हजेरी लावली होती. या पार्टिमध्ये अनेक दिग्गज उपस्थित होते. पण कनिका थांबलेले ताज हॉटेल खाली करण्याचे आदेश सरकारने दिले असल्याची माहीती समोर आली आहे. य़ा आदेशानंतर हॉटेलमध्ये एकही व्यक्ती राहत नाही.
‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार कनिका थांबलेले लखनऊमधील ताज हॉटेल खाली करण्यात आले आहे. ‘हो, आम्ही संपूर्ण हॉटेल खाली केले आहे’ अशी माहिती ताज हॉटेलच्या प्रमुखांनी दिली आहे. त्यानंतर त्यांचे पुढचे पाऊल काय असणार या बाबत त्यांना विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी ‘आम्ही आता तरी त्याची माहिती देऊ शकत नाही’ असे म्हटले.
काही दिवसांपूर्वी कनिका लंडनला गेली होती. तिकडून भारतात परतल्यावर तिने एका पार्टीमध्ये हजेरी लावली होती. ही पार्टी काँग्रेसचे जतिन प्रसाद यांचे सासरे आदेश सेठ यांनी ठेवली होती. या पार्टीला राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह, उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रकाश सिंह, संजय मिश्रा आणि इतर दिग्गज उपस्थित होते. कनिकाला करोना झाल्यामुळे आता तेथे उपस्थित असणाऱ्या अनेकांनी स्वत:चे विलगीकरण करुन घेतले आहे.
करोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळ लखनऊमध्ये तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. खुद्द कनिकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. कनिकाने ‘बेबी डॉल’, ‘बीट पे बूटी’, ‘टुकुर टुकुर’ ही गाणी गायली आहेत. तसेच तिने काही रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही काम केले आहे.

अधिक वाचा  धक्कादायक; ‘निकालाआधीच मते कशी सांगितली’ निकालाआधीच एक यादी सोशल मीडियावर व्हायरल