नवी दिल्ली – देशातील प्रख्यात रणनीतीकार प्रशांत किशोर हे आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. गांधी कुटुंबीय आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात प्रशांत किशोर यांच्या पुढील खेळीबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीयांमधील चर्चेमध्ये २०२४च्या निवडणुका अजेंड्यावर होत्या. तसेच काँग्रेसला पुन्हा कशी उभारी देता येईल आणि भाजपाविरोधातील विरोधकांच्या फ्रंटमध्ये काँग्रेसची काय भूमिका असेल याबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रशांत किशोर यांच्यासोबतच्या बैठकीत सोनिया गांधींनी उपस्थित राहणे महत्त्वपूर्ण आहे. कारण विरोधी पक्षांमधील अनेक नेते हे सोनिया गांधींसोबतच बोलणे पसंत करतात. दरम्यान, काँग्रेसला पुन्हा एकदा कसे उभे करता येईल, असा प्रश्न सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी प्रशांत किशोरला विचारला. तसेच पक्षाला तळागाळापासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत कशी उभारी देता येईल यावरही विचार विनिमय झाला. हाच प्रश्न जी-२३ नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रातून उपस्थित केला होता.

अधिक वाचा  गोविंदा-कृष्णा अभिषेकमध्ये अखेर मिटलं भांडण; 8 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

प्रशांत किशोर यांच्यासोबतच्या बैठकीत एक व्यापक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून चर्चा झाली. काँग्रेसची निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी का होत नाही आहे. काही राज्यांत पक्षाची कामगिरी खराब होऊन पक्ष संपुष्टात का येत आहे. पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी काय करता येईल, असे मुद्दे चर्चिले गेले.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत प्रशांत किशोरच्या रणनीतीच्या जोरावर ममता बँनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने बाजी मारली होती. तेव्हा रणनीती आखण्यासाठी प्रशांत किशोर यांना सर्वाधिकार बहाल करण्यात आले होते. त्यावरून तृणमूल काँग्रेसमधून विरोधाचा सूरही उमटला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोरच्या रणनीतीच्या जोरावर तृणमूल काँग्रेसला दणदणीत विजय मिळताच टीकाकारांची बोलती बंद झाली होती.

अधिक वाचा  बीडमध्ये परीक्षा केंद्रावर राडा ! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण

आता देशातील सर्वात जुन्या पक्षामध्येही असे होऊ शकते अशी अपेक्षा काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला आहे. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यास काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेमध्ये मोठे बदल दिसून येऊ शकतात. तसेच काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असेल या प्रश्नाचंही उत्तर लवकरच मिळू शकेल. काँग्रेसमध्ये स्पष्ट नेतृत्व नसल्याने पक्षाची नाव बुडत असल्याचा आरोप जी-२३ नेत्यांनी केला होता. आता याच राजकीय नावेला वाचवण्यासाठी प्रशांत किशोर यांना पुढे आणण्यात आले आहे.