देशात आणि राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे देशातील करोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या वर गेली आहे. पण अशा परिस्थितीत महाराष्ट्रातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील दोन महिन्यांमध्ये पहिल्यांदा देशातील संक्रमणाच्या दराच्या तुलनेत महाराष्ट्रातील संक्रमणाचा दर कमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच सात दिवसांमध्ये कंपाऊंडेड डेली ग्रोथ रेट (CDGR) सलग तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी झाला आहे. देशातील एक तृतीयांश पेक्षा अधिक करोनाबाधित महाराष्ट्रात आहेत.
मागील दोन आठवड्यांत देशातील कोरोनाच्या रुग्णांच्या वाढीचे प्रमाण कमी झाले आहे. १ जून रोजी महाराष्ट्रातील कंपाऊंडेड डेली ग्रोथ रेट ४.१५ टक्के होता. तर संपूर्ण देशातील कंपाऊंडेड डेली ग्रोथ रेट ४.७४ टक्के इतका होता. तर दुसरीकडे आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या दुपटीचा दर १७.३५ दिवस आहे. तर संपूर्ण भारतातील दुपटीचा दर १५.१८ दिवस इतका आहे. यापूर्वी मे महिन्याच्या मध्यात दररोज ६.५ ते ७ टक्के रुग्णसंख्या वाढत होती. तर संपूर्ण देशात ती संख्या यापेक्षा एका टक्क्यानं कमी होती.

अधिक वाचा  महायुतीच्या 50% जागा ‘डेंजर झोन’मध्ये, शहरी भागातही ‘मविआ’ची जोरदार मुसंडी! लोक पोलचा मेगा सर्वे

जर हा ट्रेंड कायम राहिला तर राष्ट्रीय पातळीवरील करोना रुग्णांच्या वाढीच्या दरात मोठी घसरण होऊ शकते. दरम्यान, याचा अर्थ दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होईल असं नाही. ती वाढेल परंतु त्या वाढीचा वेग कमी असणार आहे. सद्यस्थिती पाहिल्यास गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये दररोज ८ हजारांच्या जवळपास रुग्णसंख्या वाढत आहे. जर वाढीचा दर मंदावला नाही तर ही संख्या वाढत जाऊ शकते. १५ मे ते २५ मे या कालावधीत दररोज देशात वाढणाऱ्या रुग्णसंख्येपैकी ४० टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील होते. हा दर मार्च आणि एप्रिल महिन्याच्या तुलनेत अधिक होता. गेल्या काही दिवसांमध्ये अन्य राज्यांमध्येदेखील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये बिहार, आसाम, हरयाणा, ओदिशा, उत्तराखंड, छत्तीसगढ आणि त्रिपुरासारख्या राज्यांच्या समावेश आहे.