पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. करोना विरोधात देशवासीयांनी एकजूट दाखवावी असं आवाहन त्यांनी केलं होतं. यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. आज भाजपाचा चाळीसावा वर्धापन दिन आहे. यानिमित्त पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी मोदींनी केलेल्या दिव्याच्या आवहानाची नाळ थेट जनसंघाशी जोडली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनता पार्टीची स्थापना केली होती. त्याचं चिन्ह हे पणती होतं हे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमधून लक्षात आणून दिलं आहे.
खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा दिवा लावण्याचं आवाहन केलं तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी या संकल्पनेवरही टीका केली होती. संपूर्ण देशाला आशा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जीवनावश्यक वस्तूंबाबत बोलतील. भारताला एकही नागरीक उपाशी झोपणार नाही अशी घोषणा करतील. मास्क, सॅनिटायझर आणि औषधं मुबलक प्रमाणात आहेत असं सांगतील. करोनाशी लढण्यासाठी नवी लस शोधून काढतो आहे असं सांगतील. टेस्टिंग कमी पडणार नाहीत यावर बोलतील. जनतेला आधार देतील असं वाटलं होतं. मात्र त्यांनी नवीनच इव्हेंट काढला. काय तर म्हणे अंधार करा आणि दिवे पेटवा. सगळ्यांच्या आयुष्यात अंधार झाला आहे, अशावेळी पंतप्रधान सांगत आहेत अंधार करा आणि दिवे लावा. हा तद्दन मूर्खपणा आहे असं आव्हाड यांनी म्हटलं होतं.
आता आज जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करुन जनसंघाचा दिवा आणि काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाची तुलना केली आहे. यावर आता भाजपाचे नेते काही म्हणणार का? जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.