देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. आयपीएलचा तेरावा हंगामही बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. २९ मार्चपासून सुरु होणारा आयपीएलचा हंगाम बीसीसीायने सर्वप्रथम १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलला. मात्र परिस्थिती नियंत्रणात न आल्याने बीसीसीायने या हंगामाचं आयोजन स्थगित केलं आहे. आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला हजारो कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता वर्षाअखेरीस आयपीएल खेळवता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.
पुढील काही महिन्यांमध्ये देशातली परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर आयपीएल देशाबाहेर खेळवण्याचा पर्यायही बीसीसीआयसमोर खुला आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास कोणत्या देशामध्ये आयपीएलचं आयोजन केलं जाऊ शकतं…याचा आढावा आपण घेऊया…
१) श्रीलंका – श्रीलंकामध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव झाला असला तरीही या देशातली परिस्थिती फारशी गंभीर नाही. लंकन सरकारने आतापर्यंत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये लंकेत परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर इथे आयपीएलचं आयोजन केलं जाऊ शकतं. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शमी सिल्वा यांनी बीसीसीआयसमोर आयपीएल श्रीलंकेत भरवण्याचा पर्याय ठेवला होता. मात्र याबद्दल बीसीसीआयने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही.
२) न्यूझीलंड – इतर देशांच्या तुलनेत न्यूझीलंडमध्येही करोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. पुढील काही दिवसांत न्यूझीलंडमधली परिस्थिती नियंत्रणात येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. याआधी भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंडचा दौरा केला होता, त्यामुळे इकडचं वातावरण, खेळपट्टी याचा खेळाडूंना अंदाज आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड हा आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
३) दक्षिण आफ्रिका – श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन देशांच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत परिस्थिती फारशी योग्य नाही. या देशातही करोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र येत्या काही दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आल्यास दक्षिण आफ्रिकेत आयपीएल आयोजनाबद्दल विचार केला जाऊ शकतो. कारण २००९ साली भारतात निवडणुकांमुळे आयपीएलचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं होतं. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनासाठी दक्षिण आफ्रिका हा देखील एक उत्तम पर्याय ठरु शकतो.

अधिक वाचा  मुख्यमंत्री शिंदे ओबीसी मुद्द्यावरून खिंडीत? एकीकडे मनोज जरांगे तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यानीही आक्रमक