नागपूर: भारत बायोटेक कंपनी कोव्हॅक्सिन लसीच्या निर्मितीसाठी नागपूरच्या मिहानमध्ये प्रकल्प सुरु करणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले राजकीय वजन वापरून हा प्रकल्प पुण्याला पळवला, असा आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला. कृष्णा खोपडे हे पूर्व नागपूर मतदारसंघाचे आमदार आहेत.

कृष्णा खोपडे यांनी सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना हा आरोप केला. सिरम आणि भारत बायोटेकला मिहानमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांनी ऐनवेळी राजकीय वजन वापरुन भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्यात नेला. हा विदर्भावर अन्याय आहे. यावर नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह इतर काँग्रेस नेते गप्प का बसून आहेत, असा सवाल कृष्णा खोपडे यांनी विचारला.

अधिक वाचा  दिल्लीत कोणाच्या घरी बैठक झाली होती? शिवसेनेला एकटं पाडण्याचा प्लॅन, धनजंय मुंडेंनी शरद पवारांना घेरलं

पुण्याच्या मांजरा परिसरात भारत बायोटेकचा कारखाना

पुणे जिल्ह्यातील मांजरी खुर्द परिसरातील पूर्ण कार्यरत असलेला 12 हेक्टर जागेवर भारत बायोटेकची सहकंपनी असलेली बायोवेट कोव्हॅक्सिन लसनिर्मितीचा कारखाना स्थापन करणार आहे. मांजरी खुर्द येथील कारखान्यात लसनिर्मिती करू देण्यास परवानगी देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकाराला द्यावेत या मागणीसाठी कर्नाटकस्थित बायोवेट कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

1973 पासून ही जागा इंटरवेट इंडिया या बहुद्देशीय कंपनी आणि तिची सहकंपनी मर्क अ‍ॅण्ड कंपनीतर्फे वापरली जात होती. हा कारखाना हस्तांतरित करण्याबाबत कंपनीने बायोवेटशी करार केला होता. बायोवेटने या हस्तांतरणासाठी राज्य सरकारची परवानगी मागितली. त्यावेळी वन व संवर्धन अधिकाऱ्याने ही जागा वनक्षेत्र म्हणून आरक्षित असून 1973 मध्येही ती चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित केल्याकडे लक्ष वेधत जागेच्या हस्तांतरणास नकार दिला. त्यामुळे बायोवेटने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

अधिक वाचा  रावसाहेब दानवे अन् अर्जुन खोतकर एकाच कार्यक्रमात, पण एकमेकांशी… ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

त्यावेळी राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की, कंपनीला जीवरक्षक लसीच्या निर्मितीसाठी नक्कीच परवानगी दिली जाईल. पण कंपनीने त्या जागेवर कायमस्वरुपी ताबा घेण्याचा विचार करु नये, असे कुंभकोणी यांनी म्हटले होते.