विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. यावेळी त्यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केलं असून “यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?,” असा प्रश्नही उपस्थित केला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या पत्रानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही देवेंद्र फडणवीसांनी सुनावलं असून महाराष्ट्राच्या बदनामीचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.

“विरोधी पक्षनेते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना महाराष्ट्राच्या बाबातीत पत्र लिहून खोटी बातमी पसरवण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्रात सुरुवातीपासून सरकार गांभीर्यानं काम करत आहे. राज्य सरकारने करोना रुग्ण, मृतांचा आकडा कधीही लपवलेला नाही. महाराष्ट्रात ६२०० लॅब तयार करण्यात आल्या, जास्तात जास्त आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या असून सर्व माहिती उघडपणे लोकांसमोर ठेवत आहोत,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

अधिक वाचा  माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत ! अर्थमंत्री सीतारामन यांचे विधान चर्चेत

“याबद्दल सुप्रीम कोर्ट, इतर कोर्ट, निती आयोग यांनी प्रशंसा केली आहे, हे त्यांना पचत नाही. गुजरातमध्ये ७१ दिवसांत ६१ हजार करोनाच्या केसेस लपवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गोव्यात ऑक्सिजन मिळत नाही म्हणून लोकांचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेशात दोन हजार लोकांना नदीत प्रवाहित करण्यात आल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्र चांगली कामं करतंय हे पचत नसल्याने सरकारला बदानाम करण्याचा त्यांचा उद्योगच असेल. सोनिया गांधींना पत्र लिहून ते बदनामी करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

“जगभरात महाराष्ट्राच्या कामाची, मुंबई मॉडेलची नोंद घेतली जात असताना यांना ही कामं दिसत नसतील तर काही इलाज करु शकत नाही,” असंही ते म्हणाले आहेत.