पुणे: पुणे महापालिका प्रशासनाने रुग्णालयाची आरक्षणे विकसनासाठी दिली असून, ती बांधून पूर्ण झालेली आहेत. ही आरक्षणे प्रशासनाने ताब्यात घेऊन त्याचा वापर कोविड रुग्णालयासाठी करावा. याबाबत महापालिका प्रशासनाला सूचना करावी, अशी मागणी शहर शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गुरुवारी केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी कौन्सिल हॉल येथे पुण्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी शिवसेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेतली. शहरप्रमुख संजय मोरे, महापालिकेतील शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, शाम देशपांडे, प्रशांत बधे, संजय भोसले, बाळा ओसवाल, संगिता ठोसर आदींचा त्यात समावेश होता.

अधिक वाचा  महायुतीत ‘नाशिक’चा ट्विस्ट सुरुच! भुजबळांची भूमिका वेगळी आमची ताकद; वेगळी गोडसेंची पुन्हा वाढली चिंता

महापालिकेच्यावतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय करण्यात येणार आहे. ते नायडू हॉस्पिटल येथे नियोजित आहे. मात्र, या परिसरात खासगी रुग्णालये खूप आहेत. याउलट पुणे शहराच्या दक्षिण भागात भारती हॉस्पिटल शिवाय अन्य रुग्णालय नसल्याने आरोग्य सेवेचा असमतोल आहे. यामुळे दक्षिण भागात रुग्णालय उभारणीसाठी आरक्षित असलेल्या स्वारगेट, लक्ष्मीनारायण थिएटर परिसरातील जागेवर वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यास नागरिकांना मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागासह इतर शासकीय यंत्रणेतील करोना योद्धे गेल्या चार महिन्यांपासून अहोरात्र सेवा देत आहेत. यातील अनेक कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र कोविड सेंटर तात्काळ निर्माण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही शहर शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

अधिक वाचा  पुण्यातील शाळेत धक्कादायक प्रकार; “तुला पिक्चर दाखवतो टॉयलेटमध्ये चल..” 10 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
पुण्यात करोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात येऊन स्थितीचा आढावा घेतला. कोविड १९ चा संसर्ग पुणे जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टीने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. करोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे.

वाढता रुग्णदर व मृत्यूदर कमी करणे हे आव्हान असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.