मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही जोडगोळी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील बैठकांमध्ये नेमकी काय खलबतं सुरू आहेत, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी लवकरच धडकणार की आणखी काही घडामोडी घडणार, यावरून चर्चा झडत आहेत. शिंदे -फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी दिल्लीत जोरदार खलबतं सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत याविषयी महत्त्वाची बैठक सुरु आहे.

पंकजा मुंडेही दिल्लीत…
महाराष्ट्राच्या सहकार उद्योगावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची पकड आहे. ही वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजप आगामी काळात मोठी खेळी करणार असल्याचं म्हटलं जातंय. यासाठी राज्यातील साखर उद्योगातील बडे नेतेदेखील आज दिल्लीत उपस्थित आहेत. यात मराठवाड्यातील पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासह धनंजय महाडीक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेदेखील उपस्थित आहेत.

अधिक वाचा  तिहारमध्ये केजरीवालांना २३दिवसांपासून इन्सुलिन नाही; न्यायालय आदेशाने 5डॉक्टरांचे मेडिकल बोर्ड स्थापन

दुपारी चार वाजता बैठक…

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची महाराष्ट्रातील सहाकाराबाबत नेमकी काय रणनीती ठरते, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. अमित शाह यांच्या नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात दुपारी चार वाजता ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सहकार धोरणाचे विधेयक, सहकारातील मल्टीस्टेट कायदा, देशभरातील साखर धोरण यासंबंधी महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत मांडले जाण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी दिल्लीतून…?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दौऱ्यावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारावरही या दौऱ्यात मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाचे आमदार दिल्लीकडे डोळे लावून बसले आहेत. तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तसेच संजय शिरसाट यांनी पुढील काही तासात मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी धडकू शकते, असा दावाही केला आहे. त्यामुळे इच्छुकांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या दिल्लीच्या दिशेने लागलं आहे.