मुंबई: ‘अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिवसेनाप्रमुखांची तीच परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही, संस्कृती आहे. पण आपल्यासोबत राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. ते राजकारण मोडीत काढल्यामुळेच मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे,’ असं प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनविणार, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला.

शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोविड १९, निसर्ग चक्रीवादळात शिवसेनेनं व सरकारनं केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. भाजपनं केलेल्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. ‘शिवसेनेनं विचारधारा बदलेली नाही. पण शिवसेना कुणापुढं लाचारही होणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
‘प्रत्येक संकटात शिवसैनिक धावून जात आहेत. चक्रीवादळ असो की करोनाचे संकट. शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी उभा आहे. शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने बनल्या आहेत. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जिवाची पर्वा न करता शिवसैनिक झटत आहे. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही, डगमगणार नाही. हा शिवसैनिक सोबत असेपर्यंत मला कुणाचीही भीती नाही. शिवसेना हेच एक वादळ आहे, त्यामुळं आम्हाला इतर वादळांची पर्वा नाही,’ असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
नात्यात अंतर पडू देणार नाही!
‘शिवसैनिक हे माझ्याभोवतीचं कवच आहे, असं शिवसेनाप्रमुख म्हणायचे. हे कवचही आहे आणि त्यांचा वचकही आहे. याच शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे. मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क कमी झाला असला तरी मी नात्यात अंतर पडू देणार नाही,’ असा शब्द उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. सर्व शिवसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देतानाच काळजी घेण्याचं आवाहनही केलं.

अधिक वाचा  ठाण्यातून एकनाथ शिंदेंचाच हुकमी एक्का मैदानात; या इच्छुकाचा मात्र ‘उमेदवारी अर्ज’ देवदर्शनाचा धडाका सुरू