मुंबई:करोना साथीशी दोन हात करून स्वयंशिस्त पाळून जिल्ह्यातील स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या सांगलीकरांनी आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मोलाचं दान टाकत नवा आदर्श निर्माण केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास आभार मानले आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज सांगलीतून २ कोटी ५२ लाख २६ हजार ३९४ रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील प्रमुख बँका व सहकारी कारखान्यांच्यावतीने ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आली आहे. यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने २ कोटी २५ लाख रुपये, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने १२ लाख ७६ हजार ३९४ रुपये, राजारामबापू सहकारी बँकेच्यावतीने १४ लाख ५० हजार रुपयाचे धनादेश देण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदतीचे धनादेश दिल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरेंनी जयंत पाटील व मदत देणाऱ्या संस्थांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, सांगलीत करोनाच्या साथीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आले आहे. यात सांगलीकरांनी पाळलेली स्वयंशिस्त फार महत्त्वाची ठरली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांचं संपूर्ण स्थितीवर बारीक लक्ष आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून इस्लामपूर शहरातील गोरगरिबांना या संकटकाळात ‘माणुसकीची थाळी’ भरविली जात आहे. इस्लामपूर शहराच्या वेगवेगळ्या नऊ भागांत ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आले असून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणारे असंख्य नागरिक व परराज्यातील मजुरांचे होणारे हाल लक्षात घेऊन ही किचन सुविधा सुरू केली आहे.

अधिक वाचा  झाकलेल्या पहाटेच्या शपथविधीचा अजित पवारांकडून नित्य गौप्यस्फोटांसाठी वापर; पण नशिबी फक्तं हश्याच?