पुणे – शिवाजीनगर भागातील महापालिकेच्या शाळेत आकारलेल्या ‘एव्हिएशन गॅलरी’चे उद्‌घाटन अखेर ठरले असून, दि. 9 मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
या ‘एव्हिएशन गॅलरी’ला ‘सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी’ असे नाव देण्यात आले आहे. हे काम लोकसभा निवडणुकीपूर्वीच पूर्ण झाले आहे. परंतु, आचारसंहिता आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्‌घाटनासाठीची वेळ न मिळाल्यामुळे तिचे लोकार्पण होऊ शकले नव्हते. या गॅलरीचे काम बाळासाहेब बोडके यांच्या काळात सुरू झाले होते. मात्र, ते त्यानंतर रखडले. भाजपच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी ते पूर्ण केले आहे.
विमानाचा इतिहास उलगडणार
शिवाजीनगरच्या महापालिकेच्या शाळेत आकाराला आलेल्या या गॅलरीमध्ये विमानाच्या इतिहासापासून आजच्या काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंतची सर्व माहिती मॉडेल्ससह उपलब्ध करून दिली आहे. चार मजली गॅलरीमध्ये जगभरातील लढाऊ विमाने, हवाई परिवहन आणि रोजगाराच्या संधींचीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एवढेच नव्हे, तर प्रत्यक्षात विमान उडवण्याचा अनुभव सिम्युलेटरच्या सहाय्याने घेण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. राइट बंधूंनी विकसित केलेले विमान, सन 1783 मध्ये निर्माण करण्यात आलेले हॉट एअर बलून, विज्ञानातील प्रसिद्ध असा बरनॉली सिद्धांत, न्यूटनने मांडलेला तिसरा सिद्धांत भारतीय हवाई उड्डाणाचे जनक जे.आर.डी. टाटा, पंडित शिवकर बापूजी तळपदे यांच्याबद्दलची आणि त्यांच्या विमानांबद्दलची रंजक माहिती याठिकाणी मिळणार आहे.
माहितीपूर्ण आणि उपयुक्‍त
एरोफाइल आणि त्याचे प्रकार, विमानाचे विविध प्रकारचे पंख, विमान नियंत्रित करणारे भाग, उड्डाणांमागील विज्ञान आणि विमानांचा एकंदर इतिहास, हवाई परिवहन आणि विमान क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, विमानतळ कशाला म्हणतात, धावपट्टी काय असते, जगातील लांब धावपट्टी कुठे आहे यासह हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचे नेमके विज्ञान काय आहे, हे सचित्र मांडण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांसाठीच ही गॅलरी माहितीपूर्ण आणि उपयुक्‍त ठरणार आहे. याशिवाय पर्यटन आणि माहिती असा दुहेरी हेतू यातून साध्य होणार आहे.

अधिक वाचा  पुणे-नाशिक द्रुतगती’ला स्थगिती; फेरविचार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या दालनात बैठक