पुणे – राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या विविध 11 अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम घोषित केले आहेत. त्यामुळे खुल्या व मागासप्रवर्गातील कृषीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी मान्य झाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्‍त केले आहे.
राज्यात एकूण चार कृषी विद्यापीठे असून, त्यांतर्गत असलेल्या अनेक कृषी महाविद्यालयांमध्ये विविध विद्याशाखांच्या माध्यमातून कृषीविषयक अभ्यासक्रम शिकविले जातात. राज्यभरात हजारो विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. मात्र, यापैकी अनेक अभ्यासक्रम व्यावसायिक क्षेत्रांत येत नसल्याने खुल्या व मागासप्रवर्गातील कृषीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती मिळत नाही. नुकतीच राज्य सरकारने कृषी महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्कात वाढ करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हे शुल्क आता 50 हजार ते लाखाच्या घरात पोहोचले आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून हे वाढीव शुल्क लागू करण्यात येणार आहे.
वास्तविक पाहता, बहुतांशपणे सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांकडून कृषी अभ्यासक्रमाची निवड केली जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची शाश्‍वती असल्याने या अभ्याक्रमांना विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, कृषीच्या अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा नसल्याने संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरण्याशिवाय या विद्यार्थ्यांना पर्याय नाही. त्यामुळे वारंवार मागणी करूनही, या अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा दिला जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष वाढत होता.
याविरोधात कृषी संशोधन व शिक्षण परिषदेच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. कृषीमंत्री दादा भुसे यांना आंदोलकांच्या मागण्यांची कल्पना दिली होती.
मात्र, तरीदेखील शासनस्तरावर या प्रलंबित मागण्यांकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याने, शासनाच्या निषेधार्थ मुंडन करत आंदोलकांनी आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले होते. आंदोलनाच्या नवव्या दिवशी कृषीराज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी आंदोलकांची भेट घेऊनही, ठोस आश्‍वासन न मिळाल्याने आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. याची दखल घेत, राज्य सरकारने अकरा अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम जाहीर केल्याचा अध्यादेश काढला आहे.

अधिक वाचा  मोठी बातमी, शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर अजित पवारांच्या भेटीला

जाहीर केलेले व्यावसायिक अभ्यासक्रम
1) बीएससी(एम.बी.ए., बी.बी.एम., बी.बी.ए., बी.एससी(ऑनर्स), (कृषी व्यवस्थापन) 2) एम.एससी- कृषी

3) उद्यानविद्या,

4) वनशास्त्र,

5) कृषी जैवतंत्रज्ञान,

6) गृहविज्ञान,

7) काढणीपश्‍चात व्यवस्थापन,

8) एमएफएससी(मत्स्यविज्ञान),

9) एम. टेक -अन्न तंत्रज्ञान,

10) कृषी अभियांत्रिकी,

11) एमबीए, एमबीएम (कृषी),

(व्यवसाय व्यवस्थापन), एमएससी(कृषी)

कृषी व्यवसाय व्यवस्थापन, एमएससी(एमबीए).