लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. राजकीय नेत्यांच्या सभा होत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तर बारामतीतील प्रचार सांगता सभेत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या डोळ्यात पाणी आलं. यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. शरद पवार यांच्या पावसातील सभेचाही महाजनांनी दाखला दिला आहे. कधी पावसात ओलं व्हायचं. कधी रडायचं कधी आजारी पडायचं… आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

अधिक वाचा  लंडनच्या म्युझियमचा मोठा दावा: ही वाघनखे छत्रपतींनी अफजल खान वधात वापरल्याचा कोणताही पुरावा नाही

“शरद पवारांच्या तब्येतीवर…”

शरद पवार यांची तब्येत कमी जास्त असते. त्यांना त्रास होत असतो. त्यांच्या प्रकृतीवर बोलणं उचित होणार नाही. परंतु रोहित पवार दोन-तीन शब्द बोलले की ..काय झालं की लगेच रडायला लागतात. मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता सुद्धा येणार नाहीत. त्यामुळे लोकांना तुम्ही फार काळ वेळ बनवू शकणार नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.

रोहित पवारांना सल्ला

मुद्द्यावर बोला देशाच्या प्रश्नांवर बोला कामावर बोला तर तुम्ही मत मागा. आता रोहित पवार यांना मी बघितला आहे की ते सभेत ते वारंवार रडतात, डोळे पुसतात. तुम्ही तरुण आहात तुम्ही म्हणतात की तुमच्या मागे मोठी ताकद आहे. त्यामुळे तुम्ही मुद्द्यावर बोला आणि मत मागा…, असा सल्ला गिरीश महाजनांनी रोहित पवारांना दिलाय.

अधिक वाचा  विठ्ठल मंदिर व्हीआयपी दर्शन बंद तरी मंत्र्यांची व्हीआयपी दर्शनाच्या शिफारस पत्रावरून भाविकांमधून तीव्र नाराजी

पवारांचं कामच आहे टीकाटिप्पणी करणार मात्र प्रत्येक टीकेला उत्तर देण, हे आपल्याला काही आवश्यक नाही. त्याचे उत्तर आता लोक जनता मतदारच त्यांना आता देतील. कुणी काय सांभाळलं. कुणी काय नाही सांभाळलं. त्यामुळे आता या विषयावर नको बोललेलं तेच बरं, असं म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला गिरीश महाजनांनी उत्तर दिलं आहे.

कोणत्या नेत्यांच्या जळगावात सभा

अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सभा होतील. मात्र त्यांच्या तारखा मागे पुढे होतील. एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनीही जळगाव जिल्ह्यात यावं, असा आमचा प्रयत्न आहे. एवढ्या दोन-चार दिवसांमध्ये या सर्व नेत्यांच्या सभा या जळगाव जिल्ह्यात होतील, असंही गिरीश महाजनांनी सांगितलं.