पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. तसेच राज्यातील गडकोट आणि दुर्गांच्या संवर्धनाचे काम कर्तव्य भावनेतून मी करीन, असे आश्वासन महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू जनसंवाद मेळाव्यात मुरलीधर मोहोळ बोलत होते. पुणे शहरातील २७ हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थनार्थ हिंदू जनसंवाद मेळाव्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. या मेळाव्यात मोठ्या संख्येने तरुण आणि नागरिक उपस्थित होते.

छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी श्रीराम मंदिराचा संघर्ष मांडताना हिंदू म्हणून संघटित राहण्याचे आवाहन केले.

अधिक वाचा  लंडनच्या म्युझियमचा मोठा दावा: ही वाघनखे छत्रपतींनी अफजल खान वधात वापरल्याचा कोणताही पुरावा नाही

महायुतीचे उमेद्वार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना पुण्याच्या संस्कृती रक्षणाची व विकासाची गॅरंटी पटवून दिली. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळण्यासाठी भारत सरकारकडून शिवाजी महाराज यांच्या काळातील १२ किल्ल्यांचे नामांकन पाठवण्यात आले आहे. रायगडासह साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा त्यात समावेश आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी केंद्र सरकारकडून भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये असा प्रस्ताव युनेस्कोकडे देण्यात आला आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.

अधिक वाचा  पुन्हा राजकीय भूकंप? विधानपरिषद निवडणुक अवघ्या राज्याचं लक्ष; क्रॉस व्होटिंगचा सर्वाधिक फायदा यांनाच!

या यादीतील बहुतांश किल्ले सह्याद्रीच्या परिसरातील आहेत. सतराव्या ते एकोणीसाव्या शतकादरम्यान बांधलेल्या या किल्ल्यांच्या माध्यमातून मराठा राजवटीच्या सामरिक लष्करी शक्तीचे दर्शन होते. या आणि अशा अनेक किल्ल्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या किल्ल्यांचे जतन, संवर्धनाचे काम मी कर्तव्य भावनेतून करीन, अशी ग्वाही मोहोळ यांनी दिली.

मेळाव्यात किशोर चव्हाण, पराग ठाकुर, दिपक नागपुरे, स्वप्नील नाईक, लोकेश कोंढरे, संजय भोसले, किशोर येनपुरे, श्रीकांत शिळीमकर, अनिकेत हरपुडे यांनी मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा जाहीर करून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश पवळे यांनी केले.