राज्य सरकारने सामान्यांना वाळू कमी दरात उपलब्ध व्हावी, या हेतूने ६७६ रुपये प्रतिब्रास दराने वाळू विक्रीचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील एका ठिकाणच्या डेपोसाठीच्या ठेकेदाराला वाळू उत्खननासाठी प्रत्यक्षात २२४६ रुपये प्रतिब्रास दराने रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला एका ब्रासमागे १५७० रुपयांचा तोटा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘स्वस्त दरात वाळू विक्री’ या सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. शिरूर तालुक्यातील दोन ठिकाणी वाळू उत्खनन करणे, वाहतूक करणे, डेपोमध्ये भरणे आणि ती संबंधित ग्राहकाला उपलब्ध करून देण्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी वाळू उपशासाठी परवानगी दिली होती.

अधिक वाचा  ठाकरे गटाला राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का?; चित्रा वाघ यांचा घणाघाती आरोप

जिल्ह्यात एकच वाळूचा डेपो
शिरूर तालुक्यातील निमोणे या एकाच गावातील नदीपात्रात वाळू उत्खननासाठी दहा जणांच्या निविदा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी सहा निविदा पात्र ठरल्या होत्या. कमी दरात असलेली निविदा स्वीकारण्यात आली. त्या ठेकेदाराला वाळू उत्खननाचे काम मंजूर करण्यात आले.

२२४६ रुपये प्रतिब्रासने निविदा
नदीपात्रातून वाळू उत्खनन, डेपोपर्यंत वाहतूक करणे, डेपोतील वाळू उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार २४६ रुपये प्रतिब्रास एवढा दर ठेकेदाराने आकारला आहे. त्यामुळे तेवढी रक्कम राज्य सरकारला ठेकेदाराला द्यावी लागणार आहे. हे कंत्राट एका वर्षासाठी देण्यात आले आहे. सरकारच्या घोषणेप्रमाणे सहाशे रुपये प्रतिब्रासने वाळू मिळणे अपेक्षित आहे.

अधिक वाचा  महायुतीमध्ये काहीतरी गडबड? महाराष्ट्रात एकीकडे मोदी मैदानात उतरले तरी महायुतीचा ‘या’ जागीचा खल सुरुच

नागरिकांसाठी ६७६ रुपये प्रतिब्रास
नागरिकांसाठी वाळूची किंमत ६०० रुपये, ६० रुपये जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे शुल्क आणि १६ रुपये शौरा इन्फोटेकचे शुल्क अशी ६७६ रुपये प्रतिब्रासने वाळू उपलब्ध केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. त्यावरून राज्य सरकारला प्रतिब्रास वाळू विक्रीमध्ये सुमारे १५७० रुपयांचा तोटा सहन करावा लागणार असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

डेपोचे गुरुवारी उद्घाटन?
पुणे जिल्ह्यातील पहिला वाळू डेपो हा शिरूर तालुक्यातील निमोणे येथे होणार आहे. या डेपोचे उद्घाटन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सोमवारी हालचाली सुरू होत्या. गुरुवारी (२५ मे) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते डेपोचे उद्घाटन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.
शिरूर तालुक्यातील निमोणे येथे जिल्ह्यातील पहिल्या वाळू डेपोची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी ठेकेदाराला प्रतिब्रास २२४६ रुपये दराने वाळू उत्खनन आणि डेपोमध्ये वाळू भरण्यासाठी ठेका देण्यात आला आहे. नागरिकांनी महा ई-सेवा केंद्राकडे वाळूची मागणी नोंदवावी. त्यानुसार ६७६ रुपये प्रतिब्रास दराने वाळू उपलब्ध होईल.
– संजय बामणे, जिल्हा खनिकर्म अधिकारी