काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पोश्टर बॉईज’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय, त्याचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपटात मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यामुळेच चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय मयेकर दिग्दर्शित ‘आले रे पोश्टर बॉईज २’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहेत.

अधिक वाचा  भाऊ पार्थच्या पराभवाचा बदला मी घेणार, रोहित पवारांनी मावळमध्ये श्रीरंग बारणेंच्या पराभवाचा विडा उचलला

या चित्रपटाचे भव्य पोस्टर लाँच ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या २५ फूट पोस्टरचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसर यावेळी गर्दीने गजबजलेला होता.

‘आले रे पोश्टर बॉईज २’चे पोस्टर पाहता यात तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहेत. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकुळ घालणार आहेत, हे नक्की ! त्यांच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये ‘फुल्ल बॉडी मसाज, कॉल डॉली’ असे लिहिलेले दिसत आहे, म्हणजे हे नेमकं काय प्रकरण आहे? आणि ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’, या उक्तीनुसार कोणाची फसवणूक होणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तळपदे, एएनडब्लू स्टुडिओज आणि विरांगना फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, सेजल शिंदे आणि दिप्ती तळपदे निर्माते असून अमित भानुशाली सहनिर्माते आहेत. हितेश मोडक यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाला डॉ. सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद लाभले आहेत.

अधिक वाचा  धक्कादायक! नव्याने पदवीधर झालेल्या तरूणांच्या नोकऱ्या धोक्यात; काय आहे कारण?

निर्माते श्रेयस तळपदे म्हणतात, ” पोस्टर बॉईजच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी मला विचारणा केली. त्यामुळे पुन्हा एकदा या पोश्टर बॉईजना घेऊन त्यात कॉमेडीचा तडका मारण्यास आम्ही सज्ज झालो आहोत. आता या पोश्टर बॉईजनी परदेशात भरारी घेतली आहे त्यामुळे याची धमालही दुप्पट झाली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहेत.” निर्मात्या सेजल शिंदे म्हणतात, ‘हल्ली मराठीमध्ये खूप नवनवीन विषय हाताळले जात आहेत. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणेही गरजेचे असते. आले रे पोश्टर बॉईज २’ सारख्या चित्रपटांमधून दोन्ही गोष्टी साध्य होतात.” तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, ”पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झाली आहे. कलाकारही सर्वोत्कृष्ट असून कथाही उत्तम आहे. असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे, ‘पोश्टर बॉईज २’ ही सिनेप्रेमींना आवडेल.’