शाळांची घंटा दीड वर्षांनंतर वाजणार असली तरी पुण्यातील पालकांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत अजूनही संभ्रम आहे. तब्बल दीड वर्षांनंतर सोमवारी शाळेची घंटा एकदा वाजणार असून शाळेतील वर्गांमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. मात्र, मुलांचे लसीकरण झाल्याशिवाय त्यांना शाळेत पाठवणार नसल्याची भूमिका काही पालकांनी घेतली आहे.

राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी व पुणे महापालिका आयुक्त यांनीही शहर व ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत पालकांची गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पालकांकडून शालेय साहित्य खरेदीसाठी फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे वह्या-पुस्तक , स्कूल बॅग व इतर साहित्य विक्रेत्यांनी सांगितले.मात्र,प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर पुढील दोन -तीन दिवसात बाजारपेठेत गर्दी होईल,अशी अपेक्षा व्यापा-यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  ओमायक्रॉन वर बूस्टर डोस की कोविशिल्ड लस प्रभावी; पूनावाला हे म्हणाले

”शाळा सुरू करण्याबाबत पालकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्या तरी अजूनही विद्यार्थी-पालक शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात फिरकत नाहीत. कदाचित शाळा सुरू झाल्यानंतर स्कूल बॅग खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होईल असे शालेय साहित्य विक्रेते राजिवडेकर यांनी सांगितले.”

 लसीकरण झाल्याशिवाय शाळेत पाठवणार नाही

”मुलांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत बरेच पालक मुलांना शाळेत पाठविणार नाहीत. त्यामुळेच स्कूल बॅग किंवा इतर साहित्य खरेदीसाठी पालकांची फारशी गर्दी नाही. माझी मुलगी इयत्ता दहावीत असून तिच्यासाठी केवळ एमसीक्यू पध्दतीने होणा-या परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक पुस्तके खरेदी करण्यासाठी मी बाजारात आले असे पालक स्मिता महामुनी यांनी सांगितले.”