बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ७१ नवे चेहरे दिले आहेत. पक्षासाठी काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे, कर्नाटकात पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल. भाजपला राज्यात १५० पेक्षा जास्त जागा मिळतील, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजप उमेदवार अभय पाटील, रवी पाटील व महांतेश दोड्डगौडर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्री.सिंग बेळगावला आले होते. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी बी.एल.संतोष यांच्या विरोधात केलेले आरोप चुकीचे आहे, संतोष यांना बदनाम करण्याचे पाप शेट्टर यांनी केले आहे, असे सिंग म्हणाले.
श्री.सिंग म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी, त्यांचा उत्साह पाहता यावेळी बेळगाव जिल्ह्यात इतिहास घडणार आहे.
साडेतीन वर्षात भाजपने कर्नाटकात सर्व क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळेच कर्नाटकात गुंतवणूक वाढली आहे. बंगळू-म्हैसूर एक्सप्रेस वे, हेलीकॉप्टर निर्मिती करणारा कारखाना, वंदे भारत रेल्वे, मेट्रो या माध्यमातून भाजपचे विकासकाम मतदारांसमोर आहे.
मराठा विकास महामंडळ, लिंगायत विकास महामंडळाची स्थापना करून सर्व समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. श्री.सिंग म्हणाले, भाजपच्या या विकासाभिमुख धोरणामुळेच बेळगाव महापालिकेत सत्ता मिळाली आहे. किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी या सुविधांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकाना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
कॉंग्रेस नेत्यांकडून वारंवार देशाचा अवमान केला जातो. जाती-पातीचे राजकारण केले जाते. कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतील १० जणांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल आहेत. यावेळी कर्नाटकात कॉंग्रेसचा ऐतिहासिक पराभव होणार आहे यात शंका नाही.